ब्रह्मपुरी तालुक्यात दोघांना ठार करणारा पट्टेदार वाघ जेरबंद | पुढारी

ब्रह्मपुरी तालुक्यात दोघांना ठार करणारा पट्टेदार वाघ जेरबंद

चंद्रपूर; पुढारी ऑनलाईन : ब्रह्मपुरी तालुक्यात दुधवाही, पद्मापूर, आणि अड्याळ शेतशिवारात मागील दोन दिवसात दोघांना ठार व एकास गंभीर जखमी करणाऱ्या एका पट्टेदार नर वाघास बेशुध्द करून पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. आज, गुरूवारी (दि. १८) सकाळी साडेसातच्या सुमारास वाघाला पकडण्याची कारवाई करण्यात आली आहे. सध्या वाघ ब्रम्हपुरी वनविभागाच्या ताब्यात आहे. तर पुन्हा एका वाघास पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ब्रह्मपुरी वरून ८ किलोमीटर अंतरावर ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत अड्याळ गाव आहे. अड्याळ शेतशिवारात नागभीड तालुक्यातील मेंढा (कि.) येथील निवासी विलास विठोबा रंदये यांची शेती आहे. विलास हे अड्याळ शेतशिवारातील शेतावर गेले होते. दरम्यान जंगल परिसरात दबा धरून असलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. तर मंगळवारी (दि. १६) एकाच दिवशी ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाने हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या.

दरम्यान पद्मापूर येथील गुराखी प्रभाकर धोंडू मडावी हे गावापासून एक किलोमीटर अंतरावर जनावरे चरण्याकरीता जंगलात गेले होते. जंगलात जनावरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. यावेळी प्रभाकर यांनी प्रचंड आरडा ओरड केल्याने वाघ भयभित होवून जंगलाच्या दिशेने पळून गेला. त्यामुळे ते बचावले मात्र वाघाच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. दोन दिवसात दोघांना वाघाने ठार केल्याने शेतकरी शेतमजुरांमध्ये प्रचंड दहशत पसरली होती. त्याच दिवशी खासदार अशोक नेते यांनी ब्रह्मपुरी उपसंरक्षक यांची भेट घेऊन वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. तसेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिले होते.

गुरूवारी सकाळी साडेसातच्या सुमारास वाघाला पकडण्याकरीता अभियान राबविण्यात आले. याकरिता जलद बचाव गट, ताडोबा अंधारी प्रकल्पाचे डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी (वन्यजीव) अजय मराठे, सशस्त्र पोलिस शुटर मोहूर्ले, भोजराज दांडेकर, सुनील नन्नावरे, वपरिक्षेत्राधिकारी शेंडे, वन्यजीव अभ्यासक राकेश आहुजा आदींच्या पथकाने पट्टेदार वाघाला ट्रॅन्गुलाईजद्वारे बेशुध्द केले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. सध्या हा वाघ ब्रम्हपुरी वनविभागाच्या ताब्यात ठेवण्यात आला असून पुन्हा एका वाघाला जेरबंद करण्याकरीता शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

हे वाचलंत का?

Back to top button