चंद्रपूर : ब्रम्हपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात आ‍णखी एक शेतकरी ठार; दोन दिवसातील तिसरी घटना | पुढारी

चंद्रपूर : ब्रम्हपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात आ‍णखी एक शेतकरी ठार; दोन दिवसातील तिसरी घटना

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मंगळवारी ब्रम्हपूरी तालुक्यात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात गुराख्याला ‍‍ठार केल्याची घटना ताजी असतानाच धानपिकाचे निंदन सुरू असल्याने शेतावर गेलेल्या  शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ‍ठार  झाला. ही घटना आज (दि.१७) दुपारी बाराच्या सुमारास ब्रम्हपूरी तालुक्यातील अड्याळ शेतशिवारात घडली. विलास विठोबा रंधये ( वय ४८ रा. मेंढा (किरमिटी) ता. नागभिड ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे  शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

ब्रह्मपुरी उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत अड्याळ गाव असून ब्रह्मपुरीपासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. अड्याळ शेतशिवारात नागभिड तालुक्यातील मेंढा (कि.) येथील निवासी विलास विठोबा रंधये यांची शेती आहे. धानपिकाची लागवड केल्यानंतर त्यांच्या शेतात धानपिकाचे निंदन सुरू होते. त्यामुळे विलास हे शेतावर गेले होते. उत्तर वनपरिक्षेत्रांतर्गत् या शेतकऱ्याच्या शेताला लागूनच जंगलाचा भाग आहे. या परिसरात वन्यप्राण्यांचे वास्तव्य असल्याचे अनेकदा शेतकऱ्यांना आढळून आले आहे. शेतात निंदन सुरू असल्यामुळे विलाास हे शेताची पहाणी करीत होते. दरम्यान दबा धरून असलेल्या वाघाने अचानक त्याचेवर मागून झडप घेतली. यामध्ये ते जागीच ठार झाले.

या घटनेची माहिती स्‍थानिकांनी ब्रम्हपूरी वनविभागाला दिली. माहिती मिळताच त्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. तर काल मंगळवारी एकाच दिवशी ब्रम्हपुरी तालुक्यातच वाघाने हल्ला केल्याच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्या घटनेत गुराखी गंभीर जखमी झाला. बुधवारी पुन्हा वाघाच्या हल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने शेतकरी, शेतमजूरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने तातडीने शेतशिवारात दहशत माजविणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button