चंद्रपूर : बिअरबारमध्ये वाघाची नखे विक्रीसाठी आलेल्या एकास अटक | पुढारी

चंद्रपूर : बिअरबारमध्ये वाघाची नखे विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : वाघाची शिकार करायची आणि त्याच्या वेगवेगळ्या अवयवांची विक्री करून भरघोस पैसा कमवायचा, असा एक प्रकार चिमूर येथील बिअरबारमध्ये उघडकीस आला आहे. वाघाचे नख विकणाऱ्या एका आरोपीला नखांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. जसबिरसिंग संगतसिंग अंधेरेले असे आरोपी नाव असून तो चिमूर तालुक्यातील रा. केसलापुर येथील रहिवासी आहे.

वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, चिमूर येथील तृप्ती बार अॅण्ड रेस्टॉरंट मध्ये जसबिरसिंग वाघाचे नखे विकण्याच्या उद्देशाने आला होता. बिअरबारमध्ये तो वाघाचे नखे विकत असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक वनसंरक्षक अभिजित वायकोस, वनपरिक्षेत्राधिकारी के. डबलु. धानकुटे, क्षेत्र सहायक के. बी. गुरनुले खडसंगी व निमढेला येथील वनकर्मचाऱ्यांनी बिअरबारजवळ सापळा रचला होता. यावेळी जसबिरसिंग याला नखांची विक्री करीत असताना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर वन अधिनियम 1972 चे कलम 50, 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास ताडोबा अंधारी प्रकल्पाचे उपसंचालक जी. गुरूप्रसाद, सहायक वनसंरक्षक अभिजित वायकोस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. जसबिरसिंगने वाघाची नखे कुठून आणली?, वाघाची शिकार केली का? अन्य आरोपींचा सहभाग आहे का? आदी प्रश्नांची उकल करण्यासाठी कसून चौकशी करीत आहेत. चिमूर तालुक्याला लागूनच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असल्याने वाघाच्या शिकारीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button