आमदारांनी संरक्षण मुंबईतच सोडले : गृह खात्यावरील संशय दूर | पुढारी

आमदारांनी संरक्षण मुंबईतच सोडले : गृह खात्यावरील संशय दूर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर सुरतेला जाण्यापूर्वी शिंदे समर्थक आमदारांनी मुंबईतच पोलीस संरक्षण सोडले होते. आमदारांच्या या कृतीमुळे संबंधित पोलिसांच्या नोकर्‍या बचावल्या आहेच; शिवाय गृह खात्यावरील संशयही दूर झाला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पक्षनेतृत्वाला काहीही कळू न देता 20 जूनला हवाई तसेच ठाणेमार्गे सुरतला पलायन केले. त्यामध्ये काही मंत्र्यांचाही समावेश होता. या सर्व आमदारांना प्रत्येकी एक पोलीस संरक्षण होते. मुंबईतील आमदारांना पोलिसांच्या संरक्षण विभागामार्फत, तर ग्रामीण भागातील आमदारांना पोलीस अधीक्षक कार्यालय किंवा पोलीस आयुक्‍तालयामार्फत पोलीस संरक्षण दिले होते. एक पोलीस कर्मचारी आमदारांसोबत सतत असतो.
मुंबईतील ‘प्रोटेक्शन’ विभागातील एक अधिकारी म्हणाला, आमच्या विभागाकडून संबंधित आमदारांना संरक्षण दिले असले तरी त्याचा किती वापर करायचा हे त्या आमदारावर अवलंबून असते. खासगी किंवा वैयक्‍तिक बैठक तसेच भेट असेल तर आमदार संबंधित पोलीस कर्मचार्‍यास आपल्यासोबत शक्यतो घेऊन जाणे टाळतात. याबाबत पोलीस कर्मचार्‍यास सूचना केली जाते. सुरतेला जाण्यापूर्वी आमदारांनी तैनात पोलीस कर्मचार्‍याला खासगी कार्यक्रमाला जात असल्याचे सांगितले होते. याबाबतची माहिती संबंधित पोलीस कर्मचार्‍याने प्रोटेक्शन विभाग आणि आपल्या वरिष्ठांना दिली आहे.

ग्रामीण भागातील आमदार शक्यतो आपल्यासोबत पोलीस कर्मचारी आणत नसल्याचे आमचे निरीक्षण आहे. आता कालच्या घटनेवेळी ग्रामीण आमदारांसोबत किती पोलीस कर्मचारी होते, ते मुंबईतच राहिले किंवा पुन्हा परत गेले याबाबतची माहिती संबंधित जिल्हा पोलीस कार्यालय देऊ शकतात, असेही या अधिकार्‍याने स्पष्ट केले.

Back to top button