वाल्मिकी पठार परिसरातील गावांमधील भय कायम… | पुढारी

वाल्मिकी पठार परिसरातील गावांमधील भय कायम...

वाल्मिकी पठार; सतीश मोरे : साताऱ्यातील वाल्मिकी पठार परिसरातील अनेक गावात भूस्खलन होवून नऊ पूल वाहून गेले आहेत. विठ्ठलाई देवीच्या कृपेने आमचं गाव विठ्ठलवाडी वाचले, अशी प्रतिक्रिया ग्रामस्‍थ व्‍यक्‍त करत आहेत.

भुस्खलन झालेली घटना होऊन आता आठ दिवस झाले आहेत. मात्र, भय इथलं संपलेलं नाही. विठ्ठलवाडी सणबूर येथील ग्रामस्थ अजूनही दहशतीखाली आहेत.

२२- २३ जुलै रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे डोंगराचा जवळपास पाच-सहा हेक्टर परिसरातील भागाचे भूस्खलन होऊन दहा कुटुंबाच्या घरावर डोंगर कोसळला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.

सकाळी अकराच्या सुमारास डोंगराचा काही भाग खाली कोसळताना दिसला. काहींनी आरडा- ओरडा केल्‍याने ग्रामस्‍थांनी सावध होवून सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

संबंधित ठिकाणी उत्तम बंडू जाधव, सिताराम बंडू जाधव व त्यांचे एक भाऊ, लक्ष्मण हरी चव्हाण व त्यांचे भाऊ असे दहा परिवारातील लोक राहतात.

सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामपंचायत सणबूर व स्थानिक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेऊन बाधित कुटुंबातील लोकांची राहण्याची व खाण्याची व्यवस्था केली.

दहा- बारा दिवस झाले तरी या कुटुंबाची शासनपातळीवर योग्य ती दखल घेतली गेलेली नाही.

नुसता पंचनामा करुन शासनपातळीवर कळविले आहे.

आजही सदर कुटुंबातील लोक दुसर्‍याच्या घरीच राहत असून त्यांच्या पुनर्वसनासंबधी अथवा पर्यायी व्यवस्थेबाबत अनिश्चितता आहे.

दुसर्‍याच्या घरी आम्ही किती दिवस राहायचे? असा प्रश्न बाधित कुटुंबातील लोक करत आहेत.

खासदार श्रीनिवास पाटील व सारंग पाटील बाबा तसेच सत्यजित पाटणकर यांच्या पुढाकाराने लातूर फाऊंडेशनकडून आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वतीनेही जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले.

मात्र, मतासाठी अनेकदा या गावात येणार्‍या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी अशा कठिण परिस्थितीत गावात येऊन लोकांना धीर देण्याचे काम केलेलं नाही, अशी तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी ‘दैनिक पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.

अजूनही घरांच्या पाठीमागील डोंगराचा जवळपास पंधरा-वीस एकराचा भाग आठ ते दहा फूट खोल खचला असून कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता आहे.

त्यांच्या राहण्याचा प्रश्न गंभीर असून तो सोडवण्याचा प्रयत्न व्हावा, अशी मागणी बाधित कुटुंबातील लोक करत आहेत.

सणबूर- वाल्मिकी दरम्यानचा पंधरा किलोमीटरचा रस्ता खचला

दरम्यान, पावसामुळे सणबूर ते वाल्मिकी दरम्यानचा १५ किलोमीटरचा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे.

नऊ ठिकाणी छोटे-मोठे पूल वाहून गेले आहेत.

लेढोरीचे दोन, कामठं, कोल्हेकाठ्याचा ओढा, सदुवर्पेवाडी सळवे दरम्यान चार, तामिणेपासून पुढे धनगरवाडा, धावडवाडा, पाणेरी ते वाल्मिक रोडवरील तीन असे नऊ पूल वाहून गेले आहेत.

आंबेघर मिरगाव सारखीच परिस्थिती वाल्मिकी परिसरातील अनेक गावात झालेली आहे.

आंबेघरपासून वाल्मिकी पठार केवळ ७ किमी अंतरावर आहे. येथे सलग ४८ तास पाऊस बरसतो आहे.

वाल्मिक पठारावर वसलेल्या रुवले उधवने, तामिने, कारळे, सातर, पाळशी, सळवे, वर्पेवाडी, मान्याचीवाडी, सदुवर्पेवाडी, सावतवाडी इ. गावातील लोक या काळात जीव मुठीत धरून जगत आहेत.

सणबूर गावच्या दिशेने येणार्‍या सर्व छोट्या-मोठ्या ओढा नाल्याचे पाणी बणेराच्या ओढ्यात शिरले. या प्रवाहाने मार्गावरील शेती, घरे, विहिरी, पाणी योजना, छोटे-मोठे पूल उद्ध्वस्त करून टाकले.

सणबूर गावात ओढ्याचे पाणी घुसले. रामचंद्र ज्ञानू जाधव (फौजी), दर्शन राजाराम पुजारी, उत्तम तुकाराम पुजारी यांच्या घरात पाणी घुसले. पुढे स्मशानभूमीचे शेड बघता- बघता वाहून गेले.

एस. पी. जाधव यांच्या शेडवजा घरात पुराचे पाणी शिरले. जनावरे बाहेर काढली. मात्र, धान्याची पोती, शेती साहित्यासह शेड डोळ्यासमोर वाहत गेले.

सणबूरसह दहा पंधरा गावात ही परिस्थिती असून अजूनही येथे मदत पोहोचलेली नाही. एकाच भागात मोठ्या प्रमाणात मदत नेणार्‍या सामाजिक संघटनांनी याठिकाणी मदत द्यावी, अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा : राष्ट्रीय चरित्र घडवण्यासाठी आजही शिवचरित्र आवश्यक | शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

Back to top button