अमरिंदर सिंग यांना झटका, प्रशांत किशोर सोडणार सल्‍लागार पद | पुढारी

अमरिंदर सिंग यांना झटका, प्रशांत किशोर सोडणार सल्‍लागार पद

चंदीगड ; पुढारी ऑनलाईन : पंजाबचे मुख्‍यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सल्‍लागार पद सोडण्‍याची इच्‍छा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्‍यक्‍त केली आहे. यासंदर्भातील पत्र त्‍यांनी अमरिंदर सिंग यांना दिले आहे. पुढील वर्षी पंजाब विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्‍यामुळे प्रशांत किशोर यांचा निर्णय हा अमरिंदर यांना मोठा झटका मानला जात आहे.

सार्वजनिक जीवनातील सक्रीय भूमिकेपासून अलिप्‍त राहण्‍याचा मी निर्णय घेतला आहे. यामुळे यापुढे आपला प्रमुख राजकीय सल्‍लगार पदाची जबाबदारी घेण्‍यास मी सक्षम नाही. त्‍यामुळे मला कृपया या जबाबदारीतून मुक्‍त करावे, अशी विनंती प्रशांत किशोर यांनी पत्राव्‍दारे केली आहे.

पंजाबमध्‍ये २०२२च्‍या जानेवारी महिन्‍यात विधानसभा निवडणूक होणार आहे. मागील काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्‍हाट्यावर आला आहे. अमरिंदर यांच्‍याविरोधात नवज्‍योत सिंग सिध्‍दू यांनी थेट भूमिका घेतली.

अनेक आमदारांनी नवज्‍योतसिंग सिध्‍दू यांना जाहीर पाठिंबा दिल्‍याने अमरिंदर कोंडी झाली आहे.

अशातच प्रशांत किशोर यांनीही सल्‍लागार पद सोडण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केल्‍याने अमरिंदर यांची आणखी कोंडी होण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

पश्‍चिम बंगालमध्‍ये तृणमूल काँग्रेसच्‍या प्रमुख ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमध्‍ये द्रमुक प्रमुख स्‍टालिन यांच्‍या विजयात प्रशांत किशोर यांचे मोठे योगदान आहे.

मागील वर्षी अमरिंदर यांनी प्रशांत किशोर यांना राजकीय सल्‍लागार म्‍हणून नियुक्‍त केले होते.

यानंतर काँग्रेस पक्षातूनच या निर्णयाचा विरोध होत होता. पक्षातील काही नेत्‍यांनी याला विरोध केला होता.

प्रशांत किशोर यांना सल्‍लागार पदी नियुक्‍ती केल्‍यानंतर विरोधी पक्ष अकाली दल आणि आम आदमी पार्टीने शेतकरी कर्जमाफी, रोजगार निर्मिती आणि बेरोजगारांना भत्‍ते आदी मुद्‍यांवर पंजाबमधील काँग्रेस सरकारला घेरण्‍यास सुरुवात केली होती.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ : पुण्यातील ओशो आश्रमाचा गैरव्यवहार भक्तांनी आणला चव्हाट्यावर

Back to top button