मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरज -कोल्हापूर रेल्वे मार्ग पुन्हा खचल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.
त्यामुळे कोल्हापूर येथून सुटणाऱ्या सर्व गाड्या पुन्हा मिरजेतून सोडण्यात येत आहेत,
तर कोल्हापूर पर्यंत येणाऱ्या गाड्या मिरजेत थांबवून येथून प्रवाशांना बसद्वारे कोल्हापूरपर्यंत सोडण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पाच ठिकाणी सुमारे अडीच किलोमीटर रेल्वे मार्गाखालील भराव वाहून गेला होता.
रेल्वेकडून तातडीने भराव टाकून रेल्वे मार्ग तातडीने दुरुस्त करण्यात आला होता. परंतु दुरुस्त केलेला रेल्वेमार्ग पुन्हा खचल्याने या रेल्वेमार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा ठप्प झाली आहे.
बुधवारी मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे मार्ग खचल्याने रेल्वे हातकणंगले येथे थांबवण्यात आली. दोन तासात तात्पुरत्या स्वरूपात रेल्वे मार्ग दुरुस्त करून ही गाडी कोल्हापूरला रवाना करण्यात आली.
मात्र या मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली असून, कोल्हापूर येथून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या मिरजेतून सोडण्यात येत आहेत, तर कोल्हापूर पर्यंत येणाऱ्या गाड्या मिरजेत थांबविण्यात येत आहेत.
बुधवारी धावणारी कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री साडेनऊ वाजता मिरज स्थानकात आली. परंतु ही गाडी पुढे रवाना करण्यात आली नाही. गाडी पुढे रवाना न झाल्यामुळे रात्री महालक्ष्मी एक्सप्रेस मधील प्रवाशांनी गोंधळ घातला.
त्यानंतर पहाटे ४ वाजता कोणत्याही सुचनेशिवाय महालक्ष्मी एक्सप्रेस मिरज स्थनकातून मुंबईकडे रवाना करण्यात आली यामुळे प्रवाशांचा गोंधळ निर्माण झाला होता.