सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच | पुढारी

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच

सातारा ; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. बाधित, मृत्यू व पॉझिटिव्हिटी रेटचा चढ-उतार सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडत आहे. गुरुवारी पुन्हा बाधित आकडा हजारी पार गेला असून 1073 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत.

तर दिवसभरात 11 बाधितांचा उपचारा- दरम्यान मृत्यू झाला असून 658 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मार्च महिन्यात सुरू झालेली कोरोनाची दुसरी लाट जून महिन्यापासून ओसरतानाचे चित्र दिसत आहे. कधी बाधितांचा तर कधी

मृत्यूच्या आकड्यात वाढ होत आहे. काही दिवस पॉझिटिव्हिटी रेट हा 8 टक्क्यांच्या खाली असताना गुरुवारी तो 8.41 टक्क्यांवर गेला आहे. तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्क्यांच्या खाली आला असल्याने जिल्हा गेल्या दोन दिवसांपासून सकाळी 9 ते 4 पर्यंत खुला झाला आहे. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र असून नागरिकांनी त्रि सूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे.

गुरुवारी आढळलेल्या बाधितांमध्ये जावली 21, कराड 300, खंडाळा 83, खटाव 50, कोरेगाव 99, माण 84, महाबळेश्वर 10, पाटण 36, फलटण 142, सातारा 170, वाई 68 व इतर 10 असे बाधित आढळले आहेत.

तर सातारा जिल्ह्यात बाधितांचा आकडा 2 लाख 17 हजार 306 इतका झाला आहे. तर कराड 5, कोरेगाव 3, पाटण 1, वाई 1 व इतर 1 अशा 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर आज अखेर जिल्ह्यामध्ये 5 हजार 240 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Back to top button