छगन भुजबळ : दारू तयार करणार्‍यांचा वाइनला विरोध ; म्हणे वाइन आरोग्यवर्धक | पुढारी

छगन भुजबळ : दारू तयार करणार्‍यांचा वाइनला विरोध ; म्हणे वाइन आरोग्यवर्धक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : शेजारच्या गोवा आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यांत घराघरात दारू ठेवायला परवानगी असताना, महाराष्ट्रात मात्र वाइन विक्रीच्या निर्णयाला विरोध होत आहे. वाइनला विरोध करणारे त्यांच्या साखर कारखान्यात दारू तयार करतात, असा आरोप अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केला. वाइन आरोग्यवर्धक असल्याचे सांगत त्यांनी शासन निर्णयाचे समर्थन केले.

सोमवारी (दि. 31) जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ना. भुजबळ बोलत होते. ते म्हणाले की, शासनाने कोणताही नवीन निर्णय घेताना त्याला विरोध होतो. नाशिकमध्ये गंगापूर धरण बोटक्लबला जलप्रदूषणाच्या कारणास्तव प्रथम विरोध झाला. पण, याच बोटक्लबमध्ये पर्यटक आज आनंद लुटत असून, बोटक्लबला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकन मिळाले आहे. तसेच वाइनच्या निर्णयाचे आहे. राज्यभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. पण, वाइन ही दारू नसून, ती शरीरासाठी चांगलीच आहे. त्यामुळे विरोध करणे योग्य नसल्याचे ना. भुजबळ म्हणाले.

राज्यात 1978 नंतर दारूविक्रीच्या एकाही दुकानाला परवाना दिला नसल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. वाइन विक्रीमुळे शेतकर्‍यांचा फायदा होणार असून, त्यांचे अर्थचक्र वाढेल, असा विश्वास ना. भुजबळ यांनी व्यक्त केला. दरम्यान, महावितरणविरोधात नाशिकमध्ये शेतकर्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाकडे ना. भुजबळांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना, महावितरणवर 55 ते 60 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. पण, तरीही महावितरण कंपनीकडून शेतकर्‍यांना चालू वीजबिल भरण्याची मुभा देताना, थकबाकीतही सवलत दिली जात आहे. त्यामुळे प्रत्येकाने वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन ना. भुजबळ यांनी केले.

ऑफलाइन परीक्षेत अडचण काय?
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनावर बोलताना ना. छगन भुजबळ यांनी, राज्यात शाळा-महाविद्यालये खुली करण्याची मागणी होते. त्यानुसार शैक्षणिक संस्था सुरू केल्या. शाळा-महाविद्यालये ऑफलाइन चालतात, तर परीक्षा का नको, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वर्षभर जे ऑनलाइन शिक्षण घेतले, तेच कागदावर उतरावयाचे आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button