परमबीर सिंग खंडणी प्रकरणाला नवे वळण | पुढारी

परमबीर सिंग खंडणी प्रकरणाला नवे वळण

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह एकूण सहा पोलीस अधिकारी आणि दोन बांधकाम व्यावसायिकांवर दाखल असलेल्या खंडणी वसुलीच्या गुन्ह्याच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे. तक्रारदार बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांना फसविण्यासाठी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा खास हस्तक छोटा शकील याचा आवाज विशेष सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काढण्यात आला होता.

तसेच हा कॉल खरा वाटावा म्हणून व्हीपीएनचा वापर करण्यात आला. अग्रवाल यांच्यासह अन्य कोणालाही संशय येऊ नये म्हणून संजय पुनमिया याने सायबर तज्ज्ञाच्या मदतीने हे संपूर्ण कृत्य केल्याची धक्कादायक माहिती राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) चौकशीतून समोर आली आहे.

मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फिर्यादी बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका धमकीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले.

नोव्हेंबर 2016 ते डिसेंबर 2020 या काळातील ऑडिओ धमकीच्या प्रकरणात आपल्यावर 17 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा नोंद करून पुढे मोक्का लावण्यात आला. त्यानंतर आपल्याला आणि कुटुंबीयांना धमकावून वसुली करण्यात आली, असा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.

दाखल गुन्ह्यातील आरोपी बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया याला फोन करून धमकावल्याचे ते प्रकरण होते. यात श्यामसुंदर अग्रवालबरोबरचा मुद्दा त्याने मिटवला नाही तर, त्याला जिवानिशी मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांच्या मते, या ऑडिओमध्ये छोटा शकील याने संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी दिल्याचे ऐकू येत आहे. ज्या नंबरवरून हा फोन आला होता तो नंबर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडील माहितीनुसार छोटा शकील याचाच होता.

संजय पुनमिया याने आपल्याला अडकवण्यासाठी छोटा शकील याच्याकरवी आपले नाव घेतल्याचा दावा अग्रवाल याने केला होता. त्यामुळे मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या आधारे सुरुवातीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि त्यानंतर विशेष पथकाने अग्रवाल यांच्या विरोधात मोक्का अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यातील छोटा शकीलच्या धमकीच्या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळून पाहण्यासोबत नव्याने तपास सुरू केला होता.

पुढे हे प्रकरण सीआयडीकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रकरणी सीआयडी अजूनही तपास करत असून लवकरच आरोपपत्र दाखल करणार आहे. सीआयडीने या ऑडिओ क्लिपशी संबंधित असलेल्या सायबर तज्ज्ञाचा जबाबही नोंदवून घेतला आहे. सायबर तज्ज्ञाने या प्रकरणातील आरोपी आणि संशयितांना तांत्रिक मदत केल्याचा संशय आहे.

आरोपीने फोन कॉलचा आवाज छोटा शकीलच्या आवाजाशी जुळण्यासाठी काही सॉफ्टवेअरचा वापर केला होता. तसेच अग्रवाल याचे छोटा शकीलशी जवळचे संबंध असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न या कॉलच्या माध्यमातून केला गेला.

पाकिस्तानस्थित गँगस्टर छोटा शकीलच्या या धमकीचा आधार घेत परमबीर सिंग आणि त्याच्या साथीदारांनी अग्रवाल यांच्याविरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल केल्याचे सीआयडीच्या तपासात समोर आले आहे.

Back to top button