महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगणार का? | पुढारी

महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगणार का?

सातारा : पुढारी वृत्तसेवा

गेल्या वर्षी कुस्ती आखाड्याभोवती कोरोनाने फास आवळला. महामारीचा विळखा घट्ट झाल्यामुळे कुस्तीगीर परिषदेला नमते घ्यावे लागले होते. यंदाही जिल्हा निवड चाचणीचे सोपस्कार पूर्ण झाले असले तरी ओमायक्रॉनने खोडा घातला आहे. त्यामुळे यंदा तरी महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद दरवर्षी राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा म्हणजेच ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करते. ही स्पर्धा राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च किताबाची स्पर्धा आहे. खुल्या गटातील महाराष्ट्र केसरी शिवाय इतर वजनी गटातील नेत्रदीपक कुस्त्यांचा थरार यावेळी पहायला मिळतो. त्यामुळे पैलवान आणि कुस्ती शौकिन यांना या स्पर्धेची आस लागलेली असते. गेल्या वर्षी जिल्हानिहाय निवड चाचण्या झाल्या आहेत. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी परिषदेने जिल्हा तालिम संघांना निवड चाचणी घेण्यासाठी कळवले होते. निवड चाचणीचे सोपस्कारदेखील पार पडले. मात्र, कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे प्रशासनाने प्रत्यक्ष स्पर्धा आयोजनाला परवानगी दिली नसल्याने स्पर्धाच झाली नाही.

यावर्षीही सातारा येथे राज्यस्तरीय निवड चाचणी झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, मध्येच ओमायक्रॉनने डोके वर काढले आहे. सद्या ओमायक्रॉनची लाट ओसरायला लागली आहे. पैलवानांचे नुकसान टाळण्यासाठी कुस्तीगीर परिषदेने स्पर्धा आयोजनासाठी तयारी केली पाहिजे, अशी चर्चा कुस्ती क्षेत्रात सुरू झाली आहे.

राज्यातील कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी, इतर संघटना आणि काही नामांकित मल्लांनी परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांना भेटून स्पर्धा घेण्यासाठी त्यांना साकडे घातले आहे. दरम्यान, महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगण्यासाठी परिषदेचे वस्ताद काय भूमिका घेतात? याकडे कुस्तीशौकिन आणि मल्लांच्या नजरा लागल्या आहेत.

Back to top button