लसीकरण झालं नाही तर काेराेनाचे असे व्हेरियंट येतच राहतील : युएन प्रमुख | पुढारी

लसीकरण झालं नाही तर काेराेनाचे असे व्हेरियंट येतच राहतील : युएन प्रमुख

पुढारी ऑनलाईन डेस्क : संयुक्‍त राष्‍ट्र ( यूएन )  सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी जागतिक नेत्यांना 2022 हे सुधारण्यासाठी योग्य संधी बनवण्याचे आवाहन केले आहे. काेराेनाचा सामना समानता आणि निष्पक्षतेसोबत केला पाहिजे. जोपर्यंत आपण प्रत्येक व्यक्तीला लसीकरण करणार नाही तोपर्यंत कोरोनाचे नवे व्हेरियंट येत राहणार. हे व्हेरियंट लोकांच्या जीवन आणि अर्थव्यवस्था ठप्प करणार आहेत,  असा इशाराही त्यांनी दिला आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) च्या 2022 च्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना गुटेरेस म्‍हणाले की, गेल्या दोन वर्षांनी संपूर्ण जगाला कटू सत्य दाखवून दिले आहे की, आपण कोणाला मागे सोडले तर आपण सर्वांना मागे सोडतो. वर्ष २०२२ ला बदलाचे वर्ष बनवण्यासाठी महामारी विरोधात जगातील सर्व देशांनी एकत्रीत येण्‍याची गरज आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही बैठक कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटसाठी होत आहे. यामुळे जगाला अर्थव्यवस्था संबंधित कठीण प्रसंग येत आहेत. अशा परिस्थितीत, गुटेरेस यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय समुदायाला, विशेषत: जागतिक व्यावसायिकांना आवाहन केले की, आपल्याला पुनर्प्राप्तीसाठी आणि आर्थिक सुधारणांसाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे.

कोविड महामारीशी समानतेने आणि निष्पक्षतेने लढले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. गेल्या दोन वर्षांपासून जगभरात या महामारीने डोके वर काढले असून त्यामुळे ३०.४० कोटी लोकांना संसर्ग झाला असून ५४ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  उच्च उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसीकरण दर आफ्रिकन देशांपेक्षा सात पटीने जास्त आहे हे लज्जास्पद आहे. जर आपण प्रत्येक व्यक्तीला लसीकरण करण्यात अयशस्वी झालो तर कोरोनाचे नवे व्हेरियंट येत राहतील, असा इशारा त्‍यांनी दिला.

हेही वाचलत का?

 

 

Back to top button