देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत १३ हजारांनी घट, मात्र मृत्यूची संख्या वाढली - पुढारी

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत १३ हजारांनी घट, मात्र मृत्यूची संख्या वाढली

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा

देशात कोरोना बाधितांच्या संख्येत कालच्या तुलनेत १३ हजार १११ ने घट झाली आहे. देशात काल २ लाख ५८ हजार ८९ बाधित आढळून आले, तर ३८५ जणांचा मृत्यू झाला. दुसरीकडे १ लाख ५१ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले. देशात आजघडीला १६ लाख ५६ हजार ३४१ ॲक्टिव्ह केसेस आहेत. देशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८ हजार २०९ वर पोहोचला आहे.

दरम्यान लसीकरण मोहिमेला रविवारी एक वर्षे पूर्ण झाले असून या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 156.76 कोटी डोसेस देण्यात आले आहेत. कोरोना झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 71 लाख 22 हजार 164 वर गेली आहे तर बरे झालेल्या लोकांची संख्या 3 कोटी 50 लाख 85 हजार 721 इतकी आहे. कोरोनाने बळी घेतलेल्या एकूण लोकांची संख्या 4 लाख 86 हजार 66 वर गेली आहे.

कोरोनाच्या ताज्या लाटेचा विचार केला तर महाराष्ट्र हे सर्वाधिक प्रभावी राज्य आहे. महाराष्ट्रात गत चोवीस तासात 42 हजार 462 रूग्ण सापडले. या कालावधीत 23 लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 2.6 लाखांवर गेली आहे. मुंबईत चोवीस तासात 81 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात ओमायक्रॉनचे 125 नवे रुग्ण सापडले असून येथील या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या 1730 वर गेली आहे.

1 मार्च 2021 पासून गंभीर आजार असलेल्या 45 ते 60 वर्षे वयोगटातील लोकांचे लसीकरण सुरु करण्यात आले होते तर याच वयोगटातील सर्व लोकांच्या लसीकरणाला एप्रिलपासून सुरुवात करण्यात आली होती. 18 वर्षावरील लोकांच्या लसीकरणाला 1 मे 2021 पासून सुरुवात झाली होती.

Back to top button