माणुसकीचा मंत्र | पुढारी

माणुसकीचा मंत्र

हल्ली मोबाईलच्या हँडसेटस्मधून वेगवेगळे रिंगटोन्स, गाणी वगैरे ऐकू येत असतात. मधल्या काळात अशीच ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे…’ ही प्रार्थना कानावर पडायची. माणुसकीचा मंत्र जपणारी ही काव्यरचना! किती सुंदर, किती श्रवणीय, मन मोहवून टाकणारी! एकीकडे ऐकू येणारी ही काव्यओळ आणि दुसरीकडे आजूबाजूला पाहावं, तर माणूस माणसाशी माणसासारखं वागत नसल्याच्या घटना, त्याबद्दलच्या बातम्या, त्याबद्दलचे व्हिडीओ… मेंदू सुन्न करून टाकणारे!.

संबंधित बातम्या 

लहान मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, दलित-आदिवासी व्यक्तींना मिळणारी अन्यायकारक वागणूक, नवर्‍याकडून किंवा प्रियकराकडून होणारा बायकोचा किंवा प्रेयसीचा छळ, शिवीगाळीतून होणारी अप्रत्यक्ष हिंसा, मालकांकडून नोकरांना मिळणारी तुच्छतेची वागणूक…! उच्च-नीचतेच्या भोंगळ कल्पना आणि ‘आप-पर’भाव उराशी बाळगून होणारा, कधी दिसणारा-कधी न दिसणारा; पण जणू सार्‍या आसमंतात भरून राहिलेला भेदभाव… खरोखरंच कुठल्याही संवेदनशील मनाला सुन्न करून टाकणारा! माणूस म्हणून आपण जन्माला आलो आहोत सारे, पण माणूस म्हणून आपण इतर माणसांशी खरोखरंच ‘माणसासारखं’ वागतो का, हा आजघडीला प्रत्येक व्यक्तीला आत्मचिंतन करायला लावणारा प्रश्न ठरावा.

जात, धर्म, लिंग यावर आधारलेले भेदाभेद माणसात माणुसकीची भावना रुजूच देत नाहीत, असं वातावरण तयार झालंय का, की आजवर रुजलेली माणुसकीची भावना पोखरून काढण्याचं काम होतंय? असंख्य प्रश्न आहेत! कदाचित म्हणूनच भारतीय समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संविधानाच्या निर्मितीत अतुलनीय योगदान देणार्‍या आणि भेदाभेदांवर कठोर प्रहार करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करणं नितांत महत्त्वाचं ठरतंय. १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांना मनोभावे वंदन करण्यात आले.

Back to top button