Kitchen Knife : स्वयंपाक घरातील सुरी निवडताना… | पुढारी

Kitchen Knife : स्वयंपाक घरातील सुरी निवडताना...

स्वयंपाक घरात अन्नपदार्थ बनवताना आपल्याला छोट्या छोट्या साहित्याची गरज भासत असते. सुरी हे अशाच प्रकारचे एक साहित्य आहे. सुरीद्वारे गृहिणीला भाज्या, फळे कापता येतात. सुरीद्वारे भाज्या कापणे ही एक कला आहे. त्यासाठी आपल्याला सराव तर हवाच; मात्र भाज्या व्यवस्थित कशा कापाव्यात याचे ज्ञानही हवे. सर्वांत मुख्य गोष्ट म्हणजे भाज्या कापण्यासाठी सुरी चांगली हवी. भाज्या कापण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या सुर्‍या बाजारात उपलब्ध आहेत. शेप्स नाईफ, सँटोकू नाईफ, सेरेटेड युटिलिटी नाईफ अशा तीन प्रकारच्या सुर्‍यांद्वारे भाज्या चांगल्या कापता येतात.

Kitchen Knife : सँटोकू नाईफचा हाेताे अधिक चांगला उपयोग

सँटोकू नाईफ या सुरीचे पाते थोडे पातळ असते. तसेच अन्य दोन सुर्‍यांपेक्षा याचे वजन कमी आहे. कच्च्या भाज्या आणि फळे कापताना या सुरीचा अधिक चांगला उपयोग करता येतो. सेरेटेड युटिलिटी नाईफ ही सुरी भाज्या कापण्यासाठी फारशी वापरली जात नाही. मात्र, चॉकलेट तसेच आईस्क्रीम कापण्यासाठी ही सुरी अधिक प्रमाणात वापरली जाते.

Kitchen Knife : सुरीचे पाते आठ इंच आकाराचे असावे

सुरी निवडताना आपल्या हाताची त्यावर योग्य पकड बसेल अशा पद्धतीची निवडायला हवी. सुरी हातात धरल्यावर ती पुढच्या बाजूला जास्त झुकते आहे असे होऊ नये. तसेच टोकाचा भाग जास्त दाबला जातो आहे असेही होऊ नये. पाते समांतर राहील, अशा पद्धतीची सुरी निवडावी. बाजारात सहा इंच लांब पात्याच्या सुर्‍या उपलब्ध आहेत. मात्र, त्या भाज्या कापण्यासाठी तितक्याशा उपयुक्त ठरत नाहीत. त्याऐवजी सुरीचे पाते आठ इंच आकाराचे असावे.

संबंधित बातम्या

भाज्या कापताना आपल्या सुरीचे पाते कायमच धारदार असले पाहिजे, याकडे लक्ष द्या. धार नसेल तर भाज्या कापत असताना बोट कापण्याची शक्यता असते. काम झाल्यानंतर सुरी पाण्याने स्वच्छ धुवून कोरडी करून ठेवा. भाज्या कापताना सुरीची मूठ हातात घट्टपणे धरा. दुसर्‍या हाताने भाज्या अथवा फळे घट्ट धरून ठेवा. भाज्या आणि फळे हालणार नाहीत याची काळजी घ्या. भाज्यांचा भाग जसजसा कापला जाईल तसतसा हाताने भाज्याचा मागचा भाग पुढे सरकवत राहा. भाज्या समप्रमाणात कापल्या जाव्यात, यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते.

कांदा कापताना प्लेटमध्ये थोडा उंच लाकडी ठोकळा घ्यावा

विशेषत: कांदा कापताना गृहिणीची चांगलीच कसोटी लागते. वेगाने बारीक कांदा कापण्याचे कौशल्य हळूहळू सरावाने प्राप्त होते. त्यासाठी कापावयाच्या प्लेटमध्ये थोडा उंच लाकडी ठोकळा घ्यावा. त्यावर मधोमध कांदा ठेवून सुरीही मध्यभागी राहील अशा पद्धतीने पकडून कांदा आधी उभा आणि पोटामध्ये एक तिरपा छेद देऊन आडवा चिरावा. कांद्याची पात कापतानाही ती वेगाने कापण्यासाठी तसे कौशल्य सरावाने प्राप्त होते. फरशीवर अथवा टाईल्सवर भाज्या ठेऊन त्या कापू नयेत. (दक्षता)

Back to top button