आता तुच मार्ग दाखव..! चीनमधील तरुणाईची मंदिरांमध्‍ये गर्दी, जाणून घ्‍या कारण | पुढारी

आता तुच मार्ग दाखव..! चीनमधील तरुणाईची मंदिरांमध्‍ये गर्दी, जाणून घ्‍या कारण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमधील मंदिरात मागील काही महिन्‍यांमध्‍ये तरुणाईने गर्दी करण्‍याची संख्‍या लक्षणीयरित्‍या वाढली आहे. २०२२ मधील याच कालावधीच्या तुलनेत या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मंदिराला भेट देणार्‍या तरुणांच्‍या संख्‍येत तब्‍बल ३६७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती चिनी ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ‘कुनार’ने दिली आहे. जाणून घेवूया चीनमधील तरुणाई मंदिरात गर्दी का करत आहे याविषयी…

१६ ते २४ वयोगटातील तरुणांची मंदिराला दर्शनासाठी गर्दी

मागील काही महिन्‍यात चीनमधील कोरोना निर्बंध पूर्णपणे शिथील करण्‍यात आले. यानंतर पर्यटन आणि धार्मिक स्‍थळांना भेट देण्‍याच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. विशेषत: १६ ते २४ वयोगटातील तरुणांची मंदिराला दर्शनासाठी गर्दी होत असल्‍याचे चित्र आहे. चिनी ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म ‘कुनार’ने दिलेल्‍या माहितीनुसार, जानेवारी ते मे २०२३ या कालावधीतसुमारे २.४ दशलक्ष पर्यटकांनी चीनी बौद्ध धर्मातील चार पवित्र पर्वतांपैकी एक सिचुआनमधील माउंट एमेईला भेट दिली. २०१९ च्‍या तुलनेत ही संख्या ५० टक्क्यांनी अधिक आहे.

चीनमधील बेरोजगारीचा वाढता दर

चीनमधील आर्थिक मंदीचा फटका तरुणाईला बसत आहे. देशात रोजगार मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. आता तरुण मंदिरांमध्ये गर्दी करत रोजगारासाठी देवाला साकडे घालताना दिसत आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये मंदिरात जाणाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक भाविकांचा जन्म १९९० नंतरचा असल्‍याचे निदर्शनास आले आहे. देशात मे महिन्यात १६ ते १४ वयोगटातील बेरोजगारीचा दर २०.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना काळात झिरो कोविड पॉलीसीचा मोठा फटका चीनच्‍या अर्थव्‍यवस्‍थेला बसला आहे. शिक्षण, मालमत्ता आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मंदीमुळे नवीन पदवीधरांसाठी रोजगाराच्‍या संधी कमी झाल्‍याचे चित्र आहे.

चीनमधील सोशल मीडियावर चर्चा

तरुणाई मंदिरात गर्दी करत असल्‍याची चर्चा चीनमधील सोशल मीडियावर रंगली आहे. सोशल मीडियावर ‘धूप जाळणारा तरुण’ हा शब्द प्रयोग व्‍हायरल होत आहे. रोजगारासाठी हे तरुण मंदिरात गर्दी करत देवाला साकडे घालत असल्‍याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

मंदिरांमध्‍ये ध्‍यान अभ्‍यासक्रम ते ऑन-साइट कॅफे

तरुणाईची वाढती गर्दी पाहता चीनमधील मंदिरात ध्यान अभ्यासक्रम, ऑन-साइट कॅफे आणि वैज्ञानिक समुपदेशन केंद्रे सुरु करण्‍यात आली आहेत. याला तज्ज्ञांनी ‘मंदिर अर्थव्यवस्था’ असे नाव दिले आहे. चिनी कम्युनिस्ट पक्ष अधिकृतपणे नास्तिक असला तरी, गरजेच्या वेळी बरेच लोक प्राचीन पद्धतींकडे वळतात, अशीही चर्चा सोशल मीडियवर रंगली आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button