Temperature 2023 : यंदा जगाला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार; हवामान तज्ज्ञ | पुढारी

Temperature 2023 : यंदा जगाला तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार; हवामान तज्ज्ञ

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिवसेंदिवस तापमान वाढत असल्याचे दिसत आहे. संपूर्ण जग वाढत्या तापमानाचा सामना करत आहे.  दिवसातून एकदा तरी तुम्हाला “उन जरा जास्तच लागतयं” हे वाक्य एकदा तरी ऐकायला मिळाले असेल. उन्हात गेला तर अंगाची लाही लाही होते. नुकतेच हवामान तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे की, जगभरात यंदा तीव्र उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. हवामान तज्ज्ञांनी याचे कारण एल निनो (El Nino) पुनरागमन, असे सांगितले आहे. हवामान तज्ज्ञांनी पुढे असेही म्हंटले आहे की, हवामान बदल आणि एल निनो मुळे, जग २०२३ किंवा २०२४ मध्ये नवीन सरासरी तापमानाचा विक्रम मोडेल. (Temperature 2023)

Temperature 2023
Temperature 2023

Temperature 2023 : या वर्षी बदल दिसून येतील

हवामान तज्ज्ञांच्या मते, पॅसिफिक महासागरातील ला निना हवामानाच्या तीन वर्षानंतर, या वर्षाच्या अखेरीस जगाला एल निनोचे पुनरागमन अनुभवायला मिळेल. ला निनामुळे जागतिक तापमान किंचित कमी होते. तर एल निनोमुळे उष्ण तापमान वाढते. युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेटचे संचालक कार्लो बुओनटेम्पो यांनी स्पष्ट केले आहे की, एल निनो सामान्यतः विक्रमी जागतिक तापमानाशी संबंधित आहे. हे २०२३ किंवा २०२४ या वर्षापर्यंत दिसून येईल. ते पुढे असेही म्हणाले की,  जर आपण हवामान बदलाकडे पाहिले तर लक्षात येईल की, उन्हाळ्यात एल निनोचे पुनरागमन होईल.

तापमानात सातत्याने वाढ

आतापर्यंत तापमानात जागतिक रेकॉर्ड पाहता २०१६ हे सर्वात उष्ण वर्ष होते. एल निनोमुळेच त्याची नोंद झाली. मात्र, सध्या वातावरणातील बदलामुळे तापमानात सातत्याने वाढ होत आहे. अशा स्थितीत एल निनोशिवाय विक्रमी वाढ दिसून येईल. विशेष म्हणजे, गेली आठ वर्षे ही जगातील सर्वात उष्ण होती.

एल निनो काय आहे

पॅसिफिक महासागरातील पेरूजवळील किनारपट्टीच्या तापमानवाढीच्या घटनेला एल-निनो म्हणतात. थोडक्यात समुद्राचे तापमान आणि वातावरणातील बदल, समुद्रातील घटनेला एल निनो असे नाव देण्यात आले आहे. या बदलामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा ४-५ अंश जास्त होते.

एल निनोचा हवामानावर काय परिणाम होतो

एल निनोमुळे पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यापेक्षा जास्त गरम होते. या बदलामुळे हवामान चक्रावर वाईट परिणाम होत आहे. एल निनोचा प्रभाव संपूर्ण जगावर जाणवत आहे, त्यामुळे पाऊस, थंडी, उष्णता यात फरक आहे.

आता हवामान बदलामुळे अनेक ठिकाणी दुष्काळ तर अनेक ठिकाणी पूरस्थिती आहे. ज्या वर्षी एल निनो सक्रिय होतो, त्याचा नैऋत्य मान्सूनवर परिणाम होतो. त्यामुळे पृथ्वीच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही भागात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.  काहीवेळा एल निनोचे सकारात्मक परिणामही होऊ शकतात, उदाहरणार्थ एल निनोमुळे अटलांटिक महासागरातील चक्रीवादळांची घटना कमी होते.

हेही वाचा

Back to top button