IMD monsoon forecast | यंदा देशात मान्सून सामान्य, सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज | पुढारी

IMD monsoon forecast | यंदा देशात मान्सून सामान्य, सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार, हवामान विभागाचा अंदाज

पुढारी ऑनलाईन : देशात यंदा मान्सूनचा पाऊस सामान्य राहील. यंदा सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. देशात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे IMD ने जाहीर केलेला अधिकृत अंदाजात म्हटले आहे. (IMD monsoon forecast) देशात ९६ टक्के ते १०४ टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य पाऊस म्हटले जाते.

यावर्षी सामान्य मान्सून अपेक्षित आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (आयएमडी) महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी म्हटले आहे. मान्सून हंगामात अल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात दिसून येईल, असेही त्यांनी नमूद केले आहे. उत्तर पश्चिम भारतातील काही भाग, पश्चिम मध्य भारतातील काही भाग आणि ईशान्य भारतातील काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

अल निनोच्या धोक्यामुळे यंदा मान्सून सरासरीपेक्षा कमी पडेल, असा प्राथमिक अंदाज स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने याआधी वर्तवला आहे. जून ते सप्टेंबर या काळातील मान्सून नेहमीपेक्षा ६ टक्के कमी पडणार असून हे प्रमाण ९४ टक्के असणार आहे. यामुळे देशातील शेतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत ८५८.६ मि.मी. सरासरी पाऊस होण्याची शक्यता आहे. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै व ऑगस्ट या जोरदार मान्सून बरसणाऱ्या महिन्यांत कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांत ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या प्राथमिक अंदाजानंतर स्कायमेट पुन्हा मान्सूनचा अंदाज व्यक्त करणार आहे. मात्र, या प्राथमिक अंदाजानंतर देशभरातल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तथापि, भारतीय हवामान विभागाचा अंदाज अद्याप यायचा आहे. भारतीय हवामान विभाग आपला अंदाज १५ एप्रिलला वर्तवेल. त्यावेळी अल निनो असेल तर त्याची माहिती समोर येईल. त्यानंतर मे महिन्याच्या उत्तरार्धातही भारतीय हवामान विभागाकडून अंदाज व्यक्‍त केला जात आहे. त्यानंतर यंदाच्या पावसाची
स्थिती नेमकी कशी असेल हे स्पष्ट होणार आहे.

अल निनो व ला निनो म्हणजे काय?

संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर अल निनोचा थेट परिणाम होतो. अल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बालयेशू किंवा छोटा मुलगा तर ‘ला निना’ म्हणजेच लहान मुलगी असा होतो. सोळाव्या शतकात दक्षिण अमेरिकी मासेमारांना प्रशांत महासागराचे पाणी अचानक नेहमीपेक्षा उबदार होत असल्याचे आढळले. सहसा नाताळाच्या सुमारास हा बदल दिसल्याने त्याला ‘अल निनो’ असे नाव देण्यात आले. सामान्यतः पश्चिम-प्रशांत महासागरातील पाणी उबदार असल्यामुळे आग्नेय आशियाच्या किनाऱ्यालगत हवेचा दाब कमी असतो. स्कायमेटच्या अंदाजाप्रमाणे जूनमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत ९९ टक्के पाऊस होऊ शकतो. जुलैमध्ये
सरासरीच्या ९५ टक्के, ऑगस्टमध्ये ९२ टक्के, सप्टेंबरमध्ये ९० टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

Back to top button