Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमाने का ठरत आहेत मृत्युदूत? | पुढारी

Nepal Plane Crash : नेपाळमध्ये विमाने का ठरत आहेत मृत्युदूत?

काठमांडू : वृत्तसंस्था : नेपाळमध्ये विमाने मृत्युदूत ठरत आहेत. जुनी विमाने आणि पर्वत वैमानिकांसाठी एक आव्हान आहे. रविवारचा विमान अपघात हा गेल्या 30 वर्षांत या देशातील 28 वा विमान अपघात आहे. दुर्गम पर्वतीय भूभाग, प्रतिकूल हवामान, जुनी विमाने आणि अननुभवी वैमानिक यामुळे नेपाळ हा विमान उड्डाणासाठी सर्वात धोकादायक देश बनला आहे.

नेपाळमध्ये यती एअरलाईन्सचे काठमांडूहून निघालेले विमान पोखरा विमानतळावर उतरण्यापूर्वी 10 सेकंद आधी डोंगराला धडकून दरीत कोसळले. विमान कोसळताच आगीचे भले मोठे लोळ आकाशात उसळले. विमानात 68 प्रवासी होते. त्यातील पाचजण भारतीय होते. याशिवाय 4 क्रू मेंबर्स होते. या सर्वांचा दुर्घटनेत मृत्यू झाला.

रविवारी सकाळी आठच्या सुमारास ही दुर्घटना घडली. खराब हवामानामुळे अपघात घडल्याचे आधी सांगण्यात येत होते. पण नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाच्या माहितीनुसार लँडिंगपूर्वी 10 सेकंद अगोदर या विमानातून आगीचे लोळ दिसून आले. त्यामुळे तांत्रिक बिघाड हेच अपघाताचे कारण असावे, असे आता मानले जात आहे.

अपघातांमागची ठळक कारणे

  • रविवारचे अपघातग्रस्त विमान 42 वर्षे जुन्या मॉडेलचे होते
  • पर्वत तसेच दर्‍यांमुळे विमानांना वळणे घेण्यात अडचण
  • बर्फवृष्टी, हवामानात केव्हाही होणारे कसेही बदल
  • विमानांत उत्तम रडार यंत्रणा तसेच पात्र कर्मचार्‍यांचा अभाव

Back to top button