Malaysia Floods : मलेशियात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत; ७२००० लोकांचे स्थलांतर | पुढारी

Malaysia Floods : मलेशियात महापुरामुळे जनजीवन विस्कळीत; ७२००० लोकांचे स्थलांतर

क्वालालांपूर; पुढारी ऑनलाईन : मलेशियामध्ये वादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठी जीवित व वित्तहाणी झाली आहे. पुरामुळे शहरे आणि गावे बुडाली असून अनेक ठिकाणी रस्ते खचले असून हजारो वाहने अडकली आहेत. देशभरातील पूरग्रस्त भागात अडकलेल्या ७२००० हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. मलेशियाच्या सरकारी वेबसाइटवर पोस्ट केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे ७२००० लोकांना पूरग्रस्त आठ राज्ये आणि प्रदेशांमधून त्यांच्या मूळ ठिकाणाहून हलवण्यात आले आहे. (Malaysia Floods)

भीषण पुरामुळे मलेशियातील सेलंगोर राज्यातून 5000 हून अधिक लोकांनी आपली घरे सोडली आहेत. सेलंगोर हे मलेशियाची राजधानी क्वालालंपूरपासून अगदी जवळ आहे. पुराबद्दल चिंता व्यक्त करत पंतप्रधान इस्माईल साबरी याकूब यांनी मदत आणि बचाव कार्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सेलंगोरमधील पूरस्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सेलंगोरला पावसाळ्यात क्वचितच पूर येतो. एका सरकारी वेबसाइटने सहा मध्य आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुराचे पाणी धोकादायक पातळीपेक्षा वर गेले आहे. (Malaysia Floods)

महापुराचा वाढता प्रकोप पाहता मलेशियाची राजधानी आणि आसपासचे डझनभर रस्ते मार्ग बंद करण्यात आले आहेत. सध्या क्लांग बंदर शहराकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्याही थांबवण्यात आल्या आहेत. (Malaysia Floods)

मलेशियाच्या पूरग्रस्त भागांचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामधून व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये हजरो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे. रस्ते पाण्याखाली गेले असून त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. अनेक वाहने पाण्यात बुडाल्याचे दिसत आहे. नद्यांचे पाणी प्रवाह सोडून शेतात आणि नागरि वसाहतीमध्ये शिरले आहे. आपत्कालीन स्थितीत मदतीस धावलेले अनेक कार्यकर्ते बजावकार्यात गुंतले असून कंबरे इतक्या पाण्यातून ते नागरिकांची सुटका करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

मलेशियामध्ये ऑक्टोबर ते मार्च हा पावसाळ्याचा मौसम सुरु आहे. त्यातच आलेल्या वादळाने मागील आठवड्यापासून पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे महापुराची परिस्थिती ओढावली आहे. पुढील काळातही असात पाऊस सुरु राहण्याची शक्यता पाटबंधारे आणि जल्लनिस्सारण विभागाने दिली असल्याने अधिक सावधानी बाळगण्याचा इशारा प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

तज्ञांचे म्हणणे आहे की जलदगतीने झालेले शहरीकरण आणि जंगलांचे वसाहतींमध्ये रूपांतर तसेच औद्योगिक शेती यामुळे राजधानी क्वालालंपूरसह इतर क्षेत्रे देखील अत्यंत असुरक्षित बनली आहेत. हवामान बदलामुळे वारंवार वादळाची स्थिती आणि अतिवृष्टी वाढल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.


अधिक वाचा :

Back to top button