आजीबाई आईने दिला गोजिरवाण्या नातीला जन्म; स्वतःच्या मुलीसाठी बनली सरोगेट मदर | पुढारी

आजीबाई आईने दिला गोजिरवाण्या नातीला जन्म; स्वतःच्या मुलीसाठी बनली सरोगेट मदर

पलानो (अमेरिका); वृत्तसंस्था : आपल्या मुलीने कायम आनंदी राहावे असे प्रत्येक आईला वाटत असते. या पार्श्वभूमीवर, अमेरिकेतील 54 वर्षीय थॉमसन यांनी आपल्या 28 वर्षीय मुलीसाठी जो आनंद दिला आहे, तो जगभरासाठी एक आगळेवेगळे उदाहरण ठरला आहे.

आपली मुलगी केलीला नेहमी नाराज असल्याचे थॉमसन पाहत होत्या. लग्नाच्या अनेक दिवसांनंतरही तिला आईचे सुख मिळू शकले नव्हते. त्यामुळे मुलीच्या सुखासाठी थॉमसनने एक अनोखे पाऊल उचलले. त्यांनी सरोगेट मदर होण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुलगी आणि जावयाला सुरुवातीस तयार करावे लागले. यानंतर गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आपली मुलगी आणि जावयाच्या इनव्हिट्रो फर्टिलायझेशनपासून प्राप्त गर्भातून थॉमसन गरोदर राहिल्या आणि त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म देऊन मुलगी आणि जावयाला सुखद भेट दिली.

केली म्हणाली, मला व पतीला तीन वर्षांपासून बाळ हवे होते. मात्र, त्यात यश मिळाले नाही. यानंतर आम्ही इन्फर्टिलिटी उपचाराचा निर्णय
घेतला. मात्र, जेवढ्या वेळा गरोदर राहिले तेवढ्या वेळा गर्भपात झाला. आम्ही दहा वेळा चाचणी केली तरीही गर्भपाताचे निदान होऊ शकले नाही. यानंतर माझ्या आईने एक मोठी भेट देणार असल्याचे सांगितले. ती भेट जेव्हा वास्तवात उतरली तेव्हा माझ्या आनंदाला पारावार उरला नाही.

Back to top button