Liz Truss UK PM : लिज ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान! | पुढारी

Liz Truss UK PM : लिज ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान!

पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांची घोषणा करण्यात आली आहे. लिज ट्रस (liz truss) ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान बनल्या आहेत. मार्गारेट थॅचर आणि थेरेसा यांच्यानंतर त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या. नवीन पंतप्रधानांची घोषणा सर ग्रॅहम ब्रॅडी यांनी केली. ब्रॅडी हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्व निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी आहेत. लिज ट्रस यांना 81,326 मते मिळाली तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. या घोषणेनंतर ट्रस यांनी, पंतप्रधानपदी निवड होणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी सर्व लोकांचे आभार मानते. मी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची तत्त्वे पुढे नेईन, अशी भावना व्यक्त केली.

ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक यांचा पराभव झाला आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिज ट्रस यांनी पंतप्रधान पदी बाजी मारली आहे. त्या बोरिस जॉन्सन यांची जागा घेणार आहेत. लिस ट्रस यांची आज संध्याकाळी ब्रिटनच्या सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यापदी निवड करण्यात आली.

पंतप्रधानांच्या या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या 1 लाख 60 हजारांहून अधिक सदस्यांनी मतदान केले. ऋषी सुनक यांनी निवडणूक प्रचारादरम्यान आपण जिंकल्यास वाढत्या महागाईला लगाम घालू असे आश्वासन दिले होते. दुसरीकडे, लिज ट्रस यांनी कर कपातीचे आश्वासन दिले होते.

निवडणूक ब्रिटनमध्ये झाली असली तरी भारतात त्याची जोरदार चर्चा होती. याचे कारण ऋषी सुनक यांचे भारतीय कनेक्शन. भारतीय नागरिक सुनक यांच्या विजयासाठी त्यांना शुभेच्छा देत होते. सुनक हे भारतातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व नारायण मूर्ती (इन्फोसिसचे संस्थापक) यांचे जावई आहेत.

Back to top button