सोलोमन बेटांवर चीनचे पोलिसांना लष्करी प्रशिक्षण | पुढारी

सोलोमन बेटांवर चीनचे पोलिसांना लष्करी प्रशिक्षण

सिडनी ; वृत्तसंस्था : चीन आता ऑस्ट्रेलियाच्या आणखी जवळ पोहोचला असून दक्षिण पॅसिफिक महासागरातील सोलोमन आयलँड या छोट्या देशातील सरकारसोबत चीनने गुप्त करार केला आहे. त्यानुसार आता चिनी पोलिस येथील पोलिसांना लष्करी प्रशिक्षण देत आहेत.

काही दिवसांपूर्वीच या कराराचा खुलासा झाला आहे. त्यानंतर सोलोमन बेटांवरील हजारो नागरिक चीनविरोधात रस्त्यांवर उतले असून निषेध करत आहेत. तथापि, याचा काहीही परिणाम येथील सरकारवर झालेला नाही. तसेच सरकारने चीनसोबत मिळून काम करण्यावर सहमती दर्शवली आहे. चीन या बेटांवर लवकरच लष्करी तळ सुरू करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. जेणेकरून येथून जाणार्‍या मालवाहू जहाजांवर नियंत्रण मिळवता येईल. त्यातून कर वसुली करता येईल. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला चिंता लागून राहिली आहे. कारण ही बेटे ऑस्ट्रेलियापासून दोन हजार किलोमीटवर आहेत.

चीन-सोलोमन आयलँडमधील गुप्त करारानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सतर्क झाले असून येथील घडामोडींवर नजर ठेऊन आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या परराष्ट्र खात्यातील एका अधिकार्‍याने सोलोमन आयलँडचा गुपचूप दौरा केला होता. त्याच्याच हवाल्याने चीन पोलिस अधिकारी सोलोमनच्या पोलिसांना स्वसंरक्षण आणि काऊंटर अ‍ॅटकचे प्रशिक्षण देत असल्याचे समोर आले आहे.

Back to top button