श्रीलंकेत राजकीय संघर्ष टोकाला…!  | पुढारी | पुढारी

श्रीलंकेत राजकीय संघर्ष टोकाला...!  | पुढारी

कोलंबो (श्रीलंका) : पुढारी ऑनलाईन

भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत राजकीय संघर्ष टोकाला पोहचला आहे.  राष्ट्रपती मैत्रीपाला सिरीसेना यांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे सरकार बरखास्त करत माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान बनविले. त्यानंतर विक्रमसिंघे यांची युनायटेड नॅशनल पार्टी (यूएनपी) राष्ट्रपती सिरिसेना यांच्याविरोधात रस्त्यावर उतरली आहे. आज मंगळवारी विक्रमसिंघे यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोलंबो येथे मोठ्या संख्येने निदर्शने केली.

संसदेचे अधिवेशन बोलावून देशात लोकशाही तत्त्वांचा अवलंब करा, अशी मागणी यूएनपी पक्षाने केली आहे. माजी मंत्री चंपिका राणवाका यांनी म्हटले आहे, की आम्ही समाजातील सर्व स्तरातील लोकांना एकत्र बोलावले आहे; जे लोकशाहीवर विश्वास ठेवतात. 

दरम्यान, विक्रमसिंघे यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला आहे. तर संसदेचे सभापती जयसूर्या यांनी सद्याच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बैठक बोलावली आहे. विक्रमसिंघे आणि राजपक्षे या दोन्ही नेत्यांनी संसदेत बहुमत सिद्ध करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

राजपक्षे हे चीन समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे राजपक्षे यांचे पुन्हा सत्तेत येणे भारतासाठी चिंतेचा विषय बनणे स्वाभाविक आहे. २०१५ मध्ये सिरीसेना हे विक्रमसिंघे यांच्या पाठिंब्याने राष्ट्रपती बनले होते.

 

Back to top button