अमेरिकेकडून चीनविरोधात अनेक निर्बंधांची घोषणा | पुढारी

अमेरिकेकडून चीनविरोधात अनेक निर्बंधांची घोषणा

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

अमेरिकेत कोरोनाने दररोज जसजशी माणसे मरत आहेत, तसतसा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनविरोधातील संतापाचा पारा वाढत आहे. शनिवारी ट्रम्प यांनी चीनविरोधात पुन्हा आपला आक्रोश व्यक्त केला. चीनवर अनेक निर्बंधांची घोषणा त्यांनी केली. काही चिनी नागरिकांना अमेरिकेत अजिबात प्रवेश दिला जाणार नाही आणि चीनहून येणार्‍या कुठल्याही गुंतवणुकीला कडक कायद्यांचा सामना अमेरिकेत करावा लागेल, असे ट्रम्प यांनी जाहीर केले. 

चिनी अखत्यारीतील हाँगकाँगसमवेत झालेल्या विशेष व्यापार कराराला या क्षणापासून अमेरिका बांधील नाही, असेही ट्रम्प यांनी जाहीर केले. चीनवर बौद्धिक संपत्तीची चोरी केल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. यापूर्वीच अमेरिकन संसदेत चीनविरोधात कठोर धोरणे राबविण्याबाबतचे विधेयकही सादर झाले आहे, हे येथे उल्लेखनीय!

व्हाईट हाऊसमध्ये माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले, चीनने हाँगकाँगमधील स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या विरोधात जो नवा सुरक्षा कायदा  केला आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिका चीनच्या अखत्यारीतील हाँगकाँगसमवेत झालेली स्पेशल ट्रेड डील मोडीत काढत आहे. अमेरिकन नागरिकांना हाँगकाँगला जायचे असेल, तर त्यासाठी अमेरिका आता नवी ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायजरी जारी करेल. ट्रम्प यांच्या या घोषणांनी चीनच्या अडचणी वाढणार आहेत. 

जगाला चीनकडून उत्तर हवंय

चीनविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेऊन ट्रम्प म्हणाले, चीनकडून जगाला उत्तर हवे आहे आणि चीन मूग गिळून गप्प आहे. जगभरातील शास्त्रज्ञांना चीनमध्ये जाऊन कोरोना उद्भवाच्या संशोधनाची परवानगी चीनने द्यावी म्हणून जागतिक आरोग्य संसदेत सर्व देशांनी मिळून दबाव आणला आणि जसे त्याला यश येते आहे असे दिसले. चीनने कोरोनाच्या उद्भवासंदर्भात लगेच घुमजाव केला. चीन आता म्हणतो आहे की, वुहान वेट मार्केटच (मटण बाजार) नव्हे, तर कोरोनाची उद्भव स्थळे अनेक आहेत आणि ती जगभरात कुठेही असू शकतात… चीन जगाला मूर्ख बनवत आहे, असे सांगून ट्रम्प यांनी वुहान व्हायरस, अशी कोरोनाची संभावना केली. चीनने वुहान व्हायरस लपवून तो जगभराच्या संहारासाठी सोडून दिला, असा थेट आरोप ट्रम्प यांनी केला. वुहान व्हायरसमुळे एक लाखावर अमेरिकन लोक मरण पावले आहेत, हे मी कसे विसरू शकेन, असेही ट्रम्प म्हणाले. तसेच चीनने अमेरिकेकडून अब्जावधी डॉलर कमावले असेही ट्रम्प म्हणाले.

Back to top button