भारत, अमेरिकेनंतर आता जपानकडून चीनला झटका देण्याची तयारी सुरु! | पुढारी

भारत, अमेरिकेनंतर आता जपानकडून चीनला झटका देण्याची तयारी सुरु!

टोकियो : पुढारी ऑनलाईन 

जगातील मोठ्या आणि सामर्थ्यशाली चीनला वेगळं करण्यासाठी कसलाही कसूर सोडू इच्छित नसल्याचे चित्र जागतिक पातळीवर पहायला मिळत आहे. आता चीनच्या विरोधात भारताबरोबर उभे असलेल्या देशांमध्ये आणखी एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे जपान. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा टोकियोचा अधिकृत दौरा जपानकडून रद्द करण्याचा विचार होत असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 

अधिक वाचा : कोरोनाचं मूळ शोधण्यासाठी डब्‍ल्‍यूएचओ चीनमध्ये जाणार!

२००८ नंतर तब्बल १२ वर्षांनी चीनच्या राष्ट्रपतींचा जपान दौरा ठरला होता. सध्याचे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा जपान दौरा हा एप्रिलमध्ये होणार होता. मात्र, कोरोना विषाणूमुळे हा दौरा पुढे ढकलण्यात आल. आता जिनपिंग यांच्या भेटीसंदर्भात जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीमध्ये मोठा विरोध केला जात आहे. त्यामुळे जपानचे पंतप्रधान शिंजो आबे हे चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

कोविड १९ या महामारीची सुरुवात चीनमध्ये झाली. त्यानंतर जगातील सर्व देश आणि चीन यांच्यात तणाव वाढतच गेला. आता अलीकडच्या काळात घडणार्‍या आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे चीन आणि जपानमधील संबंधांनाही ग्रहण लागल्याचे पहायला मिळत आहे. 

चीनच्या राष्ट्रपतींना विरोध… 

लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी हा जपानचा सत्ताधारी पक्ष आहे. पक्षाच्या खासदारांनी चीनी राष्ट्रपतींच्या दौर्‍याबाबत जपान सरकारने फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे जपानचे पंतप्रधान सिंजो आबे यांच्यावर स्वत:च्याच पक्षातून दबाब वाढला आहे. त्यामुळे ते चीनी राष्ट्रपतींचा आपल्या देशातील पूर्वनियोजित दौरा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकतात. पण, जपानकडून असे चीनविरोधी पाऊल उचलेले गेल्यास चीनचा चांगलाच तिळपापड होईल असे बोलले जात आहे. 

अधिक वाचा : चीनमधील कोरोनाबाबत ‘डब्ल्यूएचओ’नं केला मोठा खुलासा

हाँगकाँगवरील नवीन सुरक्षा कायद्याबाबत जपानमधील चीनी सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. चीनच्या या सुरक्षा कायद्यामुळे हाँगकाँगमधील जपानी कंपन्या व तेथील नागरिकांचे हित धोक्यात येऊ शकते अशी भीती जपानला वाटत आहे. त्यामुळे चीनच्या राष्ट्रपतींदौ-याला रद्द करण्यासाठी हे ही एक कारण असू शकते, असे जागतिक राजकारणाच्या अभ्यासकांचे मत आहे. 

दरम्यान, भारत आणि चीन दरम्यान सुरू असणाऱ्या प्रचंड तणावाच्या वातावरणात जपानने भारताला भक्कम पाठिंबा दिला आहे. जपानचे भारतातील राजदूत सतोशी सुझुकी म्हणाले, भारत आणि चीन दरम्यान असणाऱ्या प्रत्यक्ष ताबा रेषा एकतर्फी बदलण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना जपान विरोध करेल. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांच्यासोबत उत्तम चर्चा झाली. प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थितीची त्यांनी माहिती दिली. या मुद्‌द्‌यावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा शोधण्याची भारत सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. 

जपानलाही या मुद्‌द्‌यावर शांततापूर्ण पध्दतीने आणि संवादाच्या मार्गाने तोडगा निघणे अपेक्षित आहे. जपान सध्याच्या सीमा रेषेत बदल करण्याच्या कोणत्याही एकतर्फी प्रयत्नांना विरोध करेल, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. श्रींगला यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हे ट्विट केले आहे.

अधिक वाचा : भारतानंतर आता अमेरिकेकडूनही चीनला दणका सुरु!

Back to top button