Lok Sabha Election : भाजपचे गोवा प्रभारी आशिष सूद गोव्यात; उमेदवारीबाबत चर्चा सुरू | पुढारी

Lok Sabha Election : भाजपचे गोवा प्रभारी आशिष सूद गोव्यात; उमेदवारीबाबत चर्चा सुरू

पणजी : विठ्ठल गावडे पारवाडकर

भारतीय जनता पक्षाचा दक्षिण गोव्यातील महिला उमेदवार ठरवण्यासाठी भाजपाचे गोवा प्रभारी आशिष सूद हे दिल्लीवरून आज गोव्यात दाखल झाले. भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेऊन लोकसभेसाठी दक्षिण गोव्यातील महिला उमेदवार ठरवण्याबाबत त्‍यांनी चर्चा केली. (Lok Sabha Election) दरम्यान, उद्या (दि. 6 मार्च) रोजी दिल्ली येथे होणार्‍या भाजप केंद्रीय समितीच्या बैठकीमध्ये दक्षिण गोवाच्या उमेदवारीबाबत चर्चा होणार असल्याचे कळते.

दक्षिण गोव्याचे उमेदवार म्हणून माजी खासदार अ‍ॅड. नरेंद सावईकर व माजी उपमुख्यमंत्री बाबू ऊर्फ चंद्रकांत कवळेकर यांच्यापैकी  एकाला उमेदवारी देण्‍यात येणार  असल्याची चर्चा  आहे. काल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दक्षिण गोव्यातून महिलां उमेदवारांची नावे पाठवण्याचे आदेश दिल्यानंतर तारांबळ उडाली. साेमवारी (दि. 4) सकाळी आदेशानुसार, कोर कमिटीची बैठक घेऊन काही महिलांच्या नावावर चर्चाही झाली. मात्र सामाधानकारक तोडगा निघाला नाही.

दक्षिण गोव्यातून काँग्रेसच्या उमेदवाराला टक्कर देणारी महिला उमेदवार देण्यासाठी चांगल्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. असे असतानाच आज गोवा प्रभारी सुद गोव्यात दाखल झाले. त्यांनी उमेदवारांच्या नावावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्राध्यापिका सुलक्षणा सावंत व लेखिका शैफाली वैद्य यांची नावे दक्षिण गोव्याच्या उमेदवारीसाठी चर्चेला आली आहेत. (Lok Sabha Election)

प्रा. सावंत या उत्तर गोव्यातील आहेत. त्यांनी भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून काम केले आहे. सध्या त्या भाजप महिला मोर्चाच्या प्रभारी म्हणून काम पाहत आहेत. प्रा. सावंत यांच्यासोबतच लेखिका शैफाली वैद्य व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर व अन्य अनेक नावेही सध्या चर्चेत आहेत. आज सुद यांनी गोव्यात दाखल झाल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली. द.गो. उमेदवाराठी अनेक महिलांच्या नावावर चर्चा केल्याचे कळते.

…तर पुरुषच उमेदवार

दक्षिण गोव्यातून सक्षम महिला उमेदवार न मिळाल्‍यास अ‍ॅड. सावईकर किंवा कवळेकर यांच्यातील एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते.

भाजपच्या उमेदवारीनंतर काँग्रेसचा उमेदवार

भारतीय जनता पक्षाचा उमेदवार दक्षिण गोव्यातून जाहीर झाल्यानंतरच काँग्रेसचे उत्तर आणि दक्षिण गोव्याचे उमेदवार जाहीर केले जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली आहे. आमचे उमेदवार तयार आहेत. दक्षिण गोव्यात भाजप कुण़ाला उमेदवारी देते त्याची आम्ही वाट पहात आहोत. त्यांच्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर लगेच आमच्या उमेदवाराची घोषणा आम्ही करणार आहोत, असे पाटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा :

Back to top button