गोवा : बोगमाळो येथे दरड कोसळली | पुढारी

गोवा : बोगमाळो येथे दरड कोसळली

वास्को; पुढारी वृत्तसेवा : बोगमाळो येथील चर्चच्या मागील बाजूच्या डोंगराची दरड मंगळवारी मध्यरात्री पावणेएकच्या दरम्यान कोसळल्याने चर्चच्या धर्मगुरूच्या कारची व काही पुरातन वस्तूंची मोडतोड झाली. तेथे आणखी दरड कोसळण्याची शक्यता असल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून तेथे संरक्षक भिंत बांधण्यात येणार असल्याचे चिकोळणा-बोगमाळोचे सरपंच संकल्प महाले यांनी सांगितले.

बोगमाळो चर्चच्या मागील बाजूस चर्चचे धर्मगुरु राहतात. त्यांनी कार ठेवण्यासाठी तेथे शेड उभारली आहे. या शेडमध्ये काही पुरातन वस्तूंही ठेवण्यात आल्या आहेत. चर्चच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराची दरड कोसळून मोठे खडक, माती खाली आले. त्यामुळे तेथील कारचे व काही वस्तूंचे नुकसान झाले. याप्रकरणी सरपंच महाले व इतर पंचांनी सकाळी तेथे पाहणी केली. तलाठीने तेथील पाहणी करून अहवाल तयार केला. स्थानिक रहिवाशी व अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वस्तूं सुरक्षितस्थळी हलविल्या. जेसीबीचा वापर करून तेथील दगडमाती हलविण्यात आली.या डोंगराची आणखी दरड कोसळण्याची शक्यता आहे.तेथील तीनचार मोठे ख़डक कोसळण्याची शक्यता आहे. ते खडक चर्चचे फादर फर्नांडिस यांच्या निवासस्थानाच्या वरच्या बाजूस आहेत.त्यामुळे तेथे त्वरित उपाययोजना करण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Back to top button