वास्को: कासावलीत आयपीएल सट्टेबाजांवर छापा; १० जणांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

वास्को: कासावलीत आयपीएल सट्टेबाजांवर छापा; १० जणांना अटक, १० लाखांचा मुद्देमाल जप्त

वास्को; पुढारी वृत्तसेवा : आयपीएल सट्टेबाजी (बेटिंग) प्रकरणी वेर्णा पोलिसांनी आरोसी-कासावली येथील एका घरावर गुरुवारी रात्री छापा मारून दहा संशयितांना अटक केली. कोलकाता नाईट रायडर्स व सनराईज हैदराबाद यांच्यातील सामन्याचे बेटिंग ऑनलाईन पध्दतीने हे संशयित स्वीकारत होते. त्यांच्याकडून 31 मोबाईल संच, 7 लॅपटॉप, 3 इंटरनेट रॉऊटर्स, इलेक्ट्रॉनिक साहित्य असा दहा लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई वास्कोचे उपअधीक्षक सलिम शेख, वेर्णाचे पोलीस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली संकेत तळेकर व पथकाने केली.

आरोसी येथे एका घरात भाड्याने राहणारे काहीजण आयपीएल बेटिंग घेत असल्याची माहिती मिळाल्याने वेर्णा पोलिस सतर्क झाले. संकेत तळेकर यांच्या नेतृत्वाखाली एका पोलिस पथकाने तेथे छापा टाकल्यावर सात जण सापडले. यात नितीन जयप्रताप सिंग (31, छत्तीसगड), सचिन जयप्रताप सिंग (24, उत्तरप्रदेश), सौरभ मिलिंद देशपांडे (26, पुणे, महाराष्ट्र), सन्नी ओमप्रकाश जैस्वाल (31, दिल्ली), सत्येंद्र कुमार मणीचंद्र सिंग (27, उत्तरप्रदेश), सुनील कुमार, विजयकुमार राय (27,ओडिशा), मितेश कुबेर प्रधान (23, रायगड, छत्तीसगड), नंदकिशोर बाबद्रम साहू (32, छत्तीसगड), दलिप ओम सिंह (24, राजस्थान), किशन गुमन सिंह (21, राजस्थान) यांचा समावेश आहे. यापैकी दोन संशयित हे आसाम पोलिसांना हवे आहेत.

या प्रकरणी आसाम पोलिसांना कळविण्यात आले आहे. आसाम पोलिस वास्कोला आल्यावर त्या दोघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येईल. सध्या आयपीएल स्पर्धा सुरू असल्याने ऑनलाईन बेटिंग होऊ नये. यासाठी पोलिस सतर्क आहेत. त्यामुळे जेथे संशयास्पद हालचाली आढळतील तेथे छापे मारले जात असून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सलिम शेख यांनी दिली.

हेही वाचा 

Back to top button