Goa Monsoon Tourism : गोव्यात जाताय? मग पावसाळ्यात जा! ‘या’ सणांचा उत्सव आहे खास

चिखलकाला उत्सव
चिखलकाला उत्सव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बहावा वृक्ष बहरला की पावसाचं आगमन झालंच म्हणून समजा. गोव्यातल्या पावसाची तर मजाच न्यारी. फेसाळणारा समुद्र, हिरवागार शालूने जणू नटलेला निसर्ग, यामध्ये भर पडते ती इथल्या सणांची. विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारे गोव्यातील सण हे इथल्या मान्सूनचं खरं आकर्षण असतं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही, या लेखात आपण पावसाळ्याचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या अशा काही सणांची माहिती घेऊ.

'सांजाव' उत्सव

गोव्यातील सर्वात लोकप्रिय मान्सून उत्सवांपैकी एक म्हणजे सांजाव उत्सव. हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. सेंट जॉन द बॅप्टिस्ट यांच्या नावावरून साजरा केला जाणारा हा सण पाण्याशी संबंधित आहे. विहिरी, नद्या आणि तलावांमध्ये उडी मारून जलक्रीडा करत हा सण साजरा केला जातो. सांजाव उत्सव दरवर्षी २४ जून रोजी गोव्यात साजरा केला जातो. पाण्यात तरंगणारे रंगीबेरंगी फ्लोट्स, पारंपारिक संगीत, स्थानिक लोक आणि पर्यटक एकसारखे दिसणारे कोपल्स (फुलांची माळा) घालतात, यामुळे उत्सवाच्या उत्साहात भर पडते.

सांगोड उत्सव

मान्सून उत्सवाला सुरुवात करणारा सांगोड उत्सव. गोव्यातील मासेमारी करणाऱ्या समुदायाद्वारे साजरा केला जाणारा हा पारंपारिक बोट उत्सव आहे. दरवर्षी, २९ जून रोजी, गोव्यात सेंट पीटर आणि सेंट पॉल यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ हा उत्सव साजरा केला जातो. या सणापासूनच 'रापण' मासेमारीच्या हंगामाची सुरूवात होते. आपल्या लाडक्या दर्या राजाचे आशीर्वाद घेतले जातात, विधीवत पूजा करून पुढील वाटचालीसाठी बोटी तयार केल्या जातात. छोट्या नौका एकत्र आणून त्या एकमेकांसोबत जोडल्या जातात. नारळाच्या झावळ्या, फुले आणि रंगीबेरंगी फुग्यांनी या छोट्या नावांना सजवले जाते. चर्चची प्रतिकृती या नावेच्या मध्यभागी उभारली जाते. यावेळी हा मच्छीमार करणारा समुदाय आपल्या पारंपरिक लोकनृत्याने, संगीताच्या सादरीकरणाने प्रेक्षकांचे मनोरंजन करतात.

चिखलकाला

चिखलकाला हा "द मड फेस्टिव्हल" म्हणून ओळखला जातो. गोव्यात पावसाळ्यात विशेषतः जूनमध्ये साजरा केला जाणारा पारंपरिक उत्सव आहे. गोव्यात चिखलकाला फोंडा, साखळी आणि माशेल येथे साजरा केला जातो. पण माशेल येथील चिखलकाला सर्वात प्रसिद्ध आहे. या चिखलकाल्याला माशेल येथील लोक 'गोपाळकाला' म्हणतात.

हा उत्सव भगवान कृष्ण आणि त्याची आई देवकी यांना समर्पित आहे. या उत्सवात सहभागी आनंदाने चिखलकाला खेळतात आणि पारंपरिक खेळांमध्ये मंत्रमुग्ध होऊन जातात. हा चिखलकाला देवकी-कृष्ण मंदिराच्या पुढे असलेल्या देवकी-कृष्ण मैदानावर उत्साहात खेळला जातो.

बोंदेरा उत्सव

मान्सूनच्या पावसाने निसर्ग चिंब होत असताना, दिवाडीचे नयनरम्य बेट बोंदेरा उत्सवाने न्हाऊन निघते. ऑगस्टच्या चौथ्या शनिवारी आयोजित करण्यात येणाऱ्या या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे रंगीत परेड. प्रत्येक गट रंगीबेरंगी झेंड्यांनी सजलेले चित्ररथाचे प्रदर्शन करतो. सुंदर चित्ररथासाठी बक्षीस आयोजित केलेले असते. त्यामुळे चित्ररथांची स्पर्धा असते. या उत्सवाला पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात, ते संगीत, नृत्य आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.

अशाप्रकारे गोव्याचा मान्सून म्हणजे निव्वळ बरसणाऱ्या पावसाच्या सारी एवढाच मर्यादित नाही. गोव्याची संस्कृती आणि परंपरा यांचे दर्शन घडवणारे हे उत्सव खऱ्या अर्थाने येथील मान्सूनचं आकर्षण आहे. त्यामुळे, तुमच्या बॅग पॅक करा, तुमचा आवडत्या सणाचा पोशाख घाला आणि गोव्यातील या पावसाळी उत्सवांच्या जादूमध्ये मग्न व्हायला गोव्यामध्ये नक्की जा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news