

गोवा : वनखात्याकडून वेळोवेळी विविध जनावरांना जीवदान देण्यात येते. बुधवारी दक्षिण गोव्यात खात्याकडून मासेमारीच्या जाळ्यात अडकलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराला जीवदान देण्यात आले. यानंतर खवल्या मांजराविषयी स्थानिकांमध्ये जागृतीही निर्माण करण्यात आली.
वनखात्याला स्थानिकांकडून डोंगराळ भागातील झुडुपातील जाळ्यात खवल्या मांजर अडकून पडल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी बचाव मोहीम सुरू केली. झुडपातील जाळे कापून वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी खवल्या मांजराची सुटका केली. खवल्या मांजराच्या नैसर्गिक स्वभावामुळे त्याने आपले अंग आकसून घेतले होते. त्याच्या अंगावर ठीक ठिकाणी अडकलेले जाळे काढण्यात अडथळे येत होते.
अखेर स्थानिकांच्या मदतीने काळजीपूर्वक पद्धतीने जाळे कापून खवल्या मांजराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
त्यानंतर खात्यातर्फे स्थानिकांना खवल्या मांजरा विषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मांजराचा नैसर्गिक अधिवास कोणता आहे, त्याचे अन्न कोणते आहे ,ते दुर्मिळ का झाले , याशिवाय त्याच्याबाबत असलेल्या गैरसमजाविषयी माहिती देण्यात आली. या मोहिमेत केपे उपविभागीय वनाधिकारी विशाल सुर्वे, वनाधिकारी प्रकाश नाईक , बेनहेल अंताव ,ज्युलिओ काद्रोस यांच्यासह अन्य वन्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
खवल्या मांजर हे भारतीय उपखंडात आढळते. त्याच्या अंगावरील विशिष्ट खवल्यांवरून त्याचे नाव खवल्या मांजर असे पडले आहे. या खवल्याच्या उपयोग ते स्वसरंक्षणासाठी केरते. या मांजराचे मुख्य खाद्य मुंग्या,वाळवी आहे. कधी काळी सर्रास दिसणारे खवल्या मांजर आता दुर्मिळ झाले आहे. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघटनेने खवल्या मांजराला संकटग्रस्त प्राण्यांच्या यादीत स्थान दिले आहे.
हेही वाचलं का?
वन्य जीव संरक्षण कायद्यानुसार खवल्या मांजर हा प्राणी प्रवर्ग एकमध्ये असून, त्याची शिकार करणे कायद्याने गुन्हा आहे. मांस आणि वैशिष्ट्यपूर्ण खवल्यांसाठी याची शिकार केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात अवैध विक्रीमध्ये खवल्या मांजराचे अवयव मोठ्या प्रमाणात विकले जातात. वन खात्यातर्फे आम्ही स्थानिकांमध्ये वेळोवेळी जागृती करत आहोत. कारण स्थानिकांनी मदत केली तरच वन्यजीव संरक्षण अधिक सुलभ होऊ शकते.
विशाल सुर्वे , उपविभागीय वनाधिकारी ,केपे