राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा; शेतकऱ्यांना गुंठ्याला १३५ रुपयांच्या मदतीने संतापाची लाट

राजू शेट्टीं
राजू शेट्टीं

महापूराने शेतकऱ्यांची होत असलेली दैना सुरुच असताना शासन दरबारी सुद्धा अनास्था पुन्हा एकदा दिसून आली आहे. तिप्पट रक्कम मदत म्हणून देण्याची घोषणा केल्यानंतर गुंठ्याला अवघी १३५ रुपये मदत जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या मदतीच्या घोषणेनंतर ट्विट करून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मी दोन महिन्यापासून सांगत होतो हे सरकार पुरग्रस्तांना फसवत आहे. गुंठ्याला फक्त १३५ रूपयेच देणार आहेत. त्यावेळेस मुख्यमंत्र्यापासून ते सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री म्हणत होते, आम्ही २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत देणार आहोत, पण ही थाप होती. सरकारने ठरवून शेतकऱ्यांना फसवले आहे याचा जाहीर निषेध. यांचे गंभीर परिणाम सरकारला लवकरच भोगावे लागतील !

कुरुंडवाडमध्ये शेतकरी आक्रमक

महाविकास आघाडी सरकारने तिप्पट मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र तसे न करता गुंठ्याला १३५ रुपये प्रमाणे देण्याची घोषणा करून शेतकऱ्यांची  सरकारने घोर फसवणूक केल्याचा आरोप करत या सरकारला जाग आणण्यासाठी शेतकरी लवकरच भगतसिंगचा अवतार घेतल्या शिवाय राहणार नाही असा संतप्त इशारा स्वाभिमानीचे राघू नाईक यांनी दिला आहे.

दरम्यान पुतळा दहन करतेवेळी कार्यकर्ते व पोलीस यांच्यात झटापट झाली. कुरुंदवाड येथील पालिका चौकात महा विकास आघाडी सरकारने महापुराची गुंठ्याला 135 रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अण्णासाहेब चौगुले म्हणाले, की महापुराने पूर्णता शेती नष्ट झाली आहे. शेतीतील साफसफाई करण्यासाठी 30 ते 35 हजाराचा खर्च आहे.सरकारने गुंठ्याला 135 रुपयाप्रमाणे एकराला 4 ते 5 हजार रुपये देण्याची घोषणा केल्याने कामगारांचा व साफसफाईचाही खर्च निघत नाही. माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकसानभरपाई मिळाली पाहिजे यासाठी परिक्रमा पंचगंगेची जलसमाधी आंदोलनाला सुरवात केली होती.

यावेळी विश्वास बालीघाटे, अविनाश गुदले आदींनी भाषणे केली. शिवाजी रोडे, योगेश जिवाजे  महावीर चिंचवाडे, बंडू उमडाळे, महावीर शेट्टी, संजय अपराज, पिंटू औरवाडे, अभिजित पाटील,जितेंद्र चौगुले, राजू चौगुले, सुरेश चौगुले सह आदी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचलं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news