पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 रोजी गोव्यात | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 रोजी गोव्यात

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी (दि. 11) रोजी गोव्यात येत आहेत. धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक संस्था तसेच मोप विमानतळ या दोन प्रकल्पांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच कांपाल येथे आयोजित 9 व्या जागतिक आयुर्वेद परिषदेच्या समारोप सोहळ्यात ते भाग घेतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. तसेच या दिवशी उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथील प्रत्येकी एक अशा प्रकल्पांचे आभासी पद्धतीने पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. पर्वरी येथील सचिवालयाच्या बैठक कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल उपस्थित होेते.

डॉ. सावंत म्हणाले, पंतप्रधान दिल्लीतून थेट मोपवर विमानातून उतरतील. मोप येथे जीएमआर कंपनीने पीपीपी तत्त्वावर 2870 कोटी खर्च करून बांधलेल्या विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान हेलिकॉप्टरने गोवा विद्यापीठाच्या मैदानावर उतरून कांपाल येथे येतील. तेथील बांदोडकर मैदानावर उभारलेल्या मंडपातून 350 कोटी खर्च करून केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाने बांधलेल्या धारगळ येथील अखिल भारतीय इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद या संस्था तथा इस्पितळाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी पंतप्रधान मोदी हे युनानी मेडिसिन गाजियाबाद उत्तर प्रदेश या संस्थेचे आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या दिल्ली येथील संस्थेचे व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर 9 व्या जागतिक आयुवेद परिषदेचा समारोप सोहळ्यात पंतप्रधान मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

150 मार्गदर्शकांना आमंत्रण

या परिषदेसाठी 150 मार्गदर्शकांना आमंत्रित केले असून 200 कंपनीचे 400 स्टॉल या परिषदेच्या दरम्यान लागणार आहेत. कला अकादमी, क्रीडा प्राधिकरण मैदान, बांदोडकर मैदान, राजभवनातील दरबार हॉल , राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था दोनापावला या जागी जागतिक आयुर्वेदिक परिषदेच्या विविध उपक्रमांचे आयोजन केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 2870 कोटीचा मोप

13 नोव्हेंबर 2016 रोजी पायाभरणी झालेल्या मोपा विमानतळाचे पहिल्या टप्प्याचे काम 100 टक्के पूर्ण झाले असून या कामासाठी 2870 कोटी रुपये खर्च झालेला आहे. पीपीपी मॉडलवरील हा विमानतळ जीएमआर कंपनीने बांधलेला आहे. येथे 1250 स्थानिकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यानी दिली.

1232 एकर परिसरामध्ये हे विमानतळ बसलेला असून कार्गो

सेवा तसेच प्रवासी सेवा येथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर एव्हिएशन डेव्हलपमेंट सेंटर च्या अंतर्गत प्रती वर्ष 200 लोकाना प्रशिक्षणदिले जात आहे. अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.5 जानेवारी पासून मोपावर प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होणार असल्याचे ते म्हणाले

  नावाबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे

मोपा विमानतळाला नाव देण्याचे अधिकार हे केंद्रीय विमान उड्डाण मंत्रालयाचे आहेत. त्यामुळे गोवा सरकार याबाबत कोणतीही भूमिका घेऊ शकत नाही. मनोहर पर्रीकरांचे नाव देणार की अन्य कुणाचे याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र बोलणी सुरू आहेत. असे उत्तर मोापाच्या नामकरणाच्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी दिले.

 

Back to top button