गोवा : राज्यात 19 पासून ‘सरकारी टॅक्सी अ‍ॅप’ सेवा | पुढारी

गोवा : राज्यात 19 पासून ‘सरकारी टॅक्सी अ‍ॅप’ सेवा

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा सरकारने गोव्यातील टॅक्सी चालकांसाठी गोवा टॅक्सी अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पर्वरी येथे सचिवालयात वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बुधवारी संयुक्तपणे ही घोषणा केली.

19 डिसेंबर रोजी गोवा टॅक्सी अ‍ॅप सुरू होणार आहे. गोव्यात टॅक्सीच्या सात संघटना आहेत. त्या सर्व संघटनांना सरकारतर्फे या अ‍ॅपला संलग्न होण्याची विनंती करण्यात आलेली आहे. टॅक्सीचालकांनी स्वत: हा अ‍ॅप चालू ठेवावा. सरकार हवे ते सहकार्य करील, अशी माहिती यावेळी गुदिन्हो यांनी दिली. सध्याचा काळ हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आहे. डिजिटल युगामध्ये राहून जुने नियमानुसार व्यवसाय शक्य नाही. त्यासाठीच टॅक्सी अ‍ॅप सुरू करण्यात आल्याचे ते म्हणाले.

टॅक्सीचालक हे गोव्यातील पर्यटनाचा महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांचे हित साधणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यासाठीच गोवा टॅक्सी अ‍ॅप सुरू करण्यात आला आहे. टॅक्सी चालकांनी पुढे येऊन हे अ‍ॅप चालू ठेवावे, असे आवाहन यावेळी खंवटे यांनी केले. टॅक्सी चालकांनी स्वतःला असुरक्षित समजू नये. गोवा सरकार त्यांच्या मदतीसाठी सदैव तयार आहे. पर्यटन खात्याला ई-मेल्स येतात की टॅक्सी चालकांनी जास्त पैसे घेतले. त्यावेळी पर्यटन खात्याची अर्थात गोव्याची बदनामी होते. त्यामुळेच गोवा सरकारने गोवा टॅक्सी अ‍ॅप सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगून गोवा माईल्स चांगली सेवा देत असतानाही त्याला सर्व टॅक्सीचालक संलग्न होत नसल्याने आता गोवा टॅक्सी अ‍ॅप सुरू करण्याचे ठरल्याचे खंवटे म्हणाले.

गोव्यात लाखो पर्यटक येतात त्यांना त्रास होऊ नये त्याचबरोबर येथील स्थानिकांनाही त्रास होऊ नये यासाठीच टॅक्सीचालकांनी अ‍ॅपला सलग्न व्हावे असे सांगून एखादा टॅक्सीचालक जास्त भाडे घेतो आणि मग सर्वांची बदनामी होते, असे प्रकार टाळावेत असेही त्यांनी सांगितले

Back to top button