पणजी; पुढारी वृत्तसेवा : बांबोळी येथे मंगळवारी सकाळी लागलेल्या आगीत मजुरांच्या 10 झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत दोन गॅस सिलिंडरचे स्फोट झाल्याने आगीची व्याप्ती वाढली व मजुरांचे उपजीविकेचे सामान व कपडे जळून खाक झाले.
पणजी अग्निशमन दलासह अग्निशमन मुख्यालयातील प्रत्येकी एक आगीचा बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवल्यामुळे काही झोपड्या वाचल्या. बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलच्या जवळील या झोपड्यांना सकाळी 10च्या दरम्यान अचानक आग लागली. मजूर कामासाठी झोपड्या बंद करून जवळच्याच बांधकामावर गेले होते. त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, या आगीत झोपड्यात असलेल्या दोन गॅस सिलिंडरचा स्पोट झाल्याने आग जास्त पसरली व 10 झोपड्या आगीत जळून खाक झाल्या.
सुदैवाने या मोठ्या अपघातामुळे कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. या झोपड्या तात्पुरत्या होत्या. तेथे जवळपास सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांतील कामगार राहत होते. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, दोन सिलिंडरचा स्फोट झाला व स्फोटाच्या तडाख्याने झोपड्यांवर टाकलेले पत्रे उडाले.
आगीतील दोन मोठे व एक लहान सिलिंडर बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. या आगीत मजुरांचे सुमारे 50 हजारांचे सामान खाक झाले. ही आग झोपड्यात घेतलेल्या वीज वाहिनीला शॉर्टसर्किट झाल्यामुळे लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सुदैवाने ही घटना दिवसा घडली, रात्रीची घडली असती तर मोठी दुर्घटना झाली असती, अशी प्रतिक्रिया पणजी अग्निशमन दल स्थानकाचे अधिकारी रुपेश सावंत यांनी व्यक्त केली.