१३ डिसेंबरला मोपा विमानतळाचे उद्घाटन? | पुढारी

१३ डिसेंबरला मोपा विमानतळाचे उद्घाटन?

बांदा, पुढारी वृत्तसेवा : गोवा राज्यातील प्रतिक्षेत असलेले मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. १३ डिसेंबर रोजी विमानतळाचे लोकार्पण करण्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान कार्यालयाला अधिकृत पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वेळ मागितला आहे. विमानतळाला माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा नाव देण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान कार्यालयातून होकार येताच उद्घाटनाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

उत्तर गोव्यात मोपा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारले आहे. विमानतळाची बहुतेक कामे ठेकेदार कंपनी जीएमआरकडून पूर्ण करण्यात आली आहेत. २६ ऑक्टोबर रोजी सुरक्षा परवाना मिळाल्याने उदघाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. गोव्याच्या पर्यटन हंगामाच्या दृष्टीने गोवा सरकार विमानतळाचे उद्घाटन लवकर करण्यासाठी उत्सुक आहे.

मोपा विमानतळाची लांबी साडेतीन किलोमीटरची आहे. त्यामुळे मोठे विमान उतरविणे सहज शक्य आहे. महिनाभरापूर्वीच उड्डाण चाचणीही यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. १९ डिसेंबरला गोवा मुक्ती दिनी विमानतळाचे उद्घाटन करण्याचे प्रयोजन होते. मात्र, पंतप्रधानांचा वेळ आधीच मिळाल्यास १३ डिसेंबर रोजीच उद्घाटन करण्याचे निश्चित झाल्याची चर्चा सुरु आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला अॅरोड्रम परवाना प्राप्त झाला आहे. हा परवाना मिळाल्याने मोपा विमानतळ विमान उड्डाणे हाताळण्यासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे. या परवान्यामुळे मोपा विमानतळाचे लोकार्पण डिसेंबरमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

प्रथम देशांतर्गत विमानसेवेला सुरवात

उद्घाटन झाल्यानंतर मोपा विमानतळावर देशांतर्गत विमानसेवा सुरु होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ असल्याची पुष्टी केल्यावरच आंतरराष्ट्रीय विमानतळ सेवा सुरू होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. आयसीओ (इंटरनॅशनल सिव्हील एव्हीएशन) ची अंतिम मान्यता मिळाल्यानंतरच आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु होणार आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button