गोवा :मुदत संपूनही दुकाने कायम | पुढारी

गोवा :मुदत संपूनही दुकाने कायम

वास्को; पुढारी वृत्तसेवा : वास्को सप्ताह काळात 9 ऑगस्टपर्यंत फेरीत दुकाने थाटण्यासाठी परवानगी दिलेली असतानाही ती दुकाने 13 ऑगस्टपर्यंत मुरगाव पालिकेच्या नाकावर टिच्चून उभी होती. या विक्रेत्यांसमोर पालिका का हतबल होते, हे उघड गुपित आहे. मात्र, त्या विक्रेत्यांनी गेले तीन चार दिवस वास्कोवासियांना वेठीस धरले असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेले तीन चार दिवस या विक्रेत्यांकडून भाडे घेण्यात आले काय? घेतले तर ते पालिकेच्या तिजोरीत जमा झाले काय? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ही फेरी 3 ते 9 ऑगस्ट असे सात दिवस थाटण्यासाठी स्वातंत्र्य पथ आणि सेंट वाझ मार्ग बंद ठेवण्यात आला होता. सात दिवसांनंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये फेरीचा कालावधी वाढविण्यात येणार नसल्याचे स्थानिक प्रशासनाने व मुरगाव पालिकेने जाहीर केले होते. दि. 9 पासून पोलिस व वाहतूक पोलिस निवडणूक कामांसाठी तैनात करण्यात आल्याने फेरीमध्ये पोलिस बंदोबस्त ठेवण्यास पोलिसांनी असमर्थता व्यक्त केली होती.

8 रोजी स्वातंत्र्यपथ व सेंट वाझ मार्गवरील बॅरिकेडस् हटविण्यात येऊन रस्ता वाहतुकीला खुला केला होता. परंतु, फेरी हटविण्याचे नाव मुरगाव पालिकेने घेतले नाही. सर्वजण कोठे गायब झाले होते ते देव जाणे.

मुदतीनंतरही फेरीतील दुकाने न हटविता संबंधितांना व्यवसाय करण्यासाठी पालिकेने अप्रत्यक्षपणे परवानगी दिली होती. ती 15 ऑगस्टपर्यंत देण्याचा डाव होता.ज्यांनी ही अप्रत्यक्षपणे परवनगी दिली होती, त्यांचे काही हितसंबंध असल्याने फेरीतील विक्रेते बिनधास्त होते. त्यामुळे काहीजणांनी या विरोधात आवाज उठवूनही ती दुकाने हटविण्याचे नाव घेतले जात नव्हते. 12 रोजी मात्र पालिकेच्या कामगारांनी दुकाने हटविण्याचे नाटक करताना फक्त छप्पर हटविले. मात्र विक्रेत्यांनी आपला व्यवसाय तसाच चालू ठेवला होता.
दरम्यान, दि. 13 रोजी काहीजणांनी आवाज उठविल्यावर पालिकेने विक्रेत्यांना दुकाने हटविण्याची सूचना केली. मात्र, विक्रेते ठिम्म राहिल्याने शेवटी काहीजणांचा माल जप्त करण्यात आला. तरीही उरलेला माल विकत असल्याचे चित्र दिसत होते. यावरून विक्रेत्यांनी पालिकेला आपल्या हातचे बाहुले बनविले होते हे उघड झाले.

पालिकेने असे अप्रत्यक्षपणे विक्रेत्यांना मुदत वाढ देऊन काहीजणांचे हित जपण्याऐवजी जाहीरपणे मुदतवाढ दिल्यास निदान पालिका तिजोरीत काही महसूल जमा होईल, अशा प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत.

कचर्‍याचे ढीग आणि दुर्गंधी
एकीकडे काही विक्रेते आवरते घेत असताना ग्राहकांनी गर्दी केली होती.त्यामुळे सेंट वाझ मार्ग फुलला होता.विक्रेत्यांनी कमी किंमतीमध्ये वस्तू विकण्यास आरंभ केल्याने ग्राहकांची झुंबड उडाली होती. काही दुकाने हटविल्यावर तेथे कचर्‍याचे ढीग नजरेस पडले.काही ठिकाणी तर दुर्गंधी पसरली होती. ती कशामुळे पसरली त्याबद्दल चर्चा सुरू झाली होती.

Back to top button