Lok sabha Election 2024 Results : पणजी : श्रीपाद नाईक सलग सहाव्यांदा विजयी; दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे विरिएतो फर्नांडिस विजयी | पुढारी

Lok sabha Election 2024 Results : पणजी : श्रीपाद नाईक सलग सहाव्यांदा विजयी; दक्षिण गोव्यातून काँग्रेसचे विरिएतो फर्नांडिस विजयी

पणजी : पुढारी वृत्तसेवा गोव्यातील लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांची मतमोजणी पूर्ण झाली. उत्तर गोव्यातून भाजपचे उमेदवार केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी हॅट्ट्रिक केली आहे. श्रीपाद नाईक सलग सहाव्यांदा विजयी झाले आहेत. दक्षिण गोव्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत काँग्रेस उमेदवार विरिएतो फर्नांडिस हे विजयी झाले. श्रीपाद नाईक यांनी माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांचा 1 लाख 11 हजार 559 मतांनी पराभव केला तर विरिएतो फर्नांडिस यांनी भाजपच्या दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी श्रीनिवास धेंपे यांचा 15, 545 मतांनी पराभव केला.

संपूर्ण गोव्यामध्ये काँग्रेसचे अवघे तीन आमदार आणि त्यांना तीन इतर आमदारांचा पाठिंबा होता. तर भाजपच्या बाजूला तब्बल 33 आमदार होते. दक्षिणेमध्ये तर काँग्रेसच्या बाजूला फक्त त्यांचे दोन व आपचे दोन आणि गोवा फॉरवर्डचा एक असे पाच आमदार आणि भाजपच्या बाजूला 13 भाजपचे व 2 अपक्ष आमदार होते. तरीही भाजपच्या उमेदवार धेंपे पराभूत झालेल्या आहेत.

श्रीपाद नाईक यांनी सलग सहाव्यांदा निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानले आहेत. मतांच्या माध्यमातून मतदारांना आपणाला जो आशीर्वाद दिलेला आहे, त्या आशीर्वादाच्या बळावर आपण पुन्हा एकदा जनसेवेमध्ये रुजू होणार असल्याचे सांगितले.

दक्षिण गोव्याच्या निकालाबाबत बोलताना श्रीपाद नाईक म्हणाले, भाजपने महिलांचा आदर करण्यासाठी पहिल्यांदा दक्षिण गोव्यातून महिला उमेदवार दिली होती. मात्र सलग दहा वर्षे केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळे सत्ता विरोधी मानसिकतेचा फटका दक्षिण गोव्यात आणि देशांमध्येही काही जागी बसल्याचे श्रीपाद नाईक म्हणाले. तरीही केंद्रात भाजपच्या नेतृत्वात एनडीएची सत्ता येणार असल्याचे ते म्हणाले. पल्लवी धेंपे यांनी चांगली टक्कर दिल्याचे ते म्हणाले.

उत्तर गोव्याचे पराभूत उमेदवार अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी आपण उत्तर गोव्यात आपल्या मागे एक आमदार होता. तरीही 18 भाजप समर्थक आमदारांशी लढा दिला आणि चांगली मते घेतली. आपणाला ज्यांनी मते दिली त्या सर्वांचे आभार. श्रीपाद नाईक हे आपले मित्र आहेत. त्यांच्या विजयाबद्दल आपण त्यांचे अभिनंदन करत असल्याचे त्यांनी सांगितले. दक्षिण गोव्यात व देशात काँग्रेसला जे यश मिळाले आहे ती एक चांगली पुन्हा एकदा सुरुवात असल्याचे सांगून दक्षिण गोव्यातून निवडून आलेले काँग्रेसचे विरिएतो फर्नांडिस यांचेही आपण अभिनंदन करत असल्याचे खलप म्हणाले. यापुढेही जनसेवेचे व्रत चालूच राहिल, असे रमाकांत खलप यांनी सांगितले.

Back to top button