‘मधुमेह, हृदयविकार संशोधनातील माहिती संकलनाचा पहिला टप्पा पूर्ण : डॉ. एन. कलईसेल्व्ही | पुढारी

'मधुमेह, हृदयविकार संशोधनातील माहिती संकलनाचा पहिला टप्पा पूर्ण : डॉ. एन. कलईसेल्व्ही

पणजी; पुढारी वृत्तसेवा : भारतात मधुमेह, हृदयविकार आणि रक्तदाबाच्या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची कारणे शोधणारे संशोधन अजून झालेले नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय तसेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीने पहिल्यांदाच या विषयावर अभ्यास सुरू करण्यात आला असून, 10 हजार रुग्णांचा तपशील गोळा करण्यात आला आहे. त्यात 45 टक्के महिला आहेत. 98 कोटी रुपयांचा खर्च येणार्‍या या मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण झाला असल्याची माहिती औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एन. कलईसेल्व्ही यांनी दिली. या वेळी ‘इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक इंटिग्रेटिव बायोलॉजी’चे संचालक डॉ. सान्विक मैती, तसेच ‘नेशनल इन्स्टिट्युटऑफ ओशिएनोग्राफी’चे संचालक सुनीलकुमार सिंग व इतर वैज्ञानिक उपस्थित होते.

या दीर्घकालीन विस्तारित कालावधीच्या आरोग्यविषयक देखरेख प्रकल्पाला ‘फिनोम इंडिया अनबॉक्सिंग 1.0’ असे नामकरण करण्यात आले आहे. गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आदी 25 शहरे आणि 17 राज्यांत हे सर्वेक्षण सुरू झाले आहे, असे ते म्हणाले. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) ‘फिनोम इंडिया-सीएसआयआर हेल्थ कोहोर्ट नॉलेजबेस’ या आरोग्यविषयक सर्वेक्षण प्रकल्पाचा पहिला टप्पा यशस्विरीत्या पूर्ण झाल्याची घोषणा करताना चांगला प्रतिसाद मिळाला. महिला एरवी यासंदर्भात स्वत:हून पुढे येत नाहीत; पण, 45 टक्के महिला रूग्णांनी सहकार्य केले, असे त्यांनी सांगितले.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा हा दीर्घकालीन विस्तारित कालावधीचा पथदर्शी उपक्रम आहे. मैलाचा दगड ठरलेल्या या यशानिमित्त वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे 3 जून रोजी गोव्यात राष्ट्रीय सागरी परिसंस्था अभ्यास संस्थेत ‘फिनोम इंडिया अनबॉक्सिंग 1.0’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. फिनोम इंडिया – सीएसआयआर हेल्थ कोहोर्ट नॉलेजबेस या उपक्रमाचा प्रारंभ मागच्या वर्षी 7 डिसेंबर 2023 रोजी झाला होता. भारतीय नागरिकांमधील कार्डिओ मेटाबोलिक (हृदय आणि चयापचय क्रियेसंबंधी) आजारांशी संबंधित जोखिमांविषयक बाबींचे अभ्यासपूर्ण मूल्यांकन करण्याचे उद्दिष्ट परिषदेने समोर ठेवले आहे. या अभिनव उपक्रमात सुमारे 10,000 जणांनी आपली आरोग्यविषयक सर्वंकष माहिती पुरवण्यासाठी स्वेच्छेने पुढाकार घेत परीक्षणासाठी स्वयंसेवक म्हणून नोंदणी केली आहे. यात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांचा समावेश आहे. त्यांच्याकडून विविध निकषांवर आधारित अत्यंत व्यापक स्वरूपातील माहितीसाठा संकलित केला आहे.

बहुस्तरीय माहितीसाठ्याचे संकलन

या प्रकल्पाअंतर्गत, जिनोमिक्स, मायक्रोबायोम विश्लेषण, प्लाझ्मा प्रोटिऑमिक्स आणि मेटाबोलॉमिक्स अशा बहुआयामी आणि बहुस्तरीय माहितीसाठ्याचे एकत्रित संकलन करण्यात येईल. त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानावर आधारित अत्यंत व्यापक माहितीसाठ्याच्या प्रगत विश्लेषक तंत्राची जोड देण्यात येईल. तसेच, त्याद्वारे अंदाज व्यक्त करू शकणारे प्रारूप विकसित करावे, असे उद्दिष्ट वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने समोर ठेवले आहे.

Back to top button