गोवा : पंतप्रधान मोदी जगात लोकप्रिय | पुढारी

गोवा : पंतप्रधान मोदी जगात लोकप्रिय

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  देशातील प्रत्येक व्यक्तींचा विचार करून योजना तयार केली आहे. त्याची 100 टक्के अंमलबजावणी व्हावी, यासाठी वर्षाचे 365 दिवस अहोरात्र परिश्रम घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकमेव राज्यकर्ते आहेत. म्हणूनच ते देशातच नव्हे तर जगात लोकप्रिय ठरले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

भाजपतर्फे येथे आयोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 20 वर्षांच्या यशस्वी कार्यावर लिहिलेल्या पुस्तकाच्या परिसंवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, कार्यक्रम संयोजक प्रेमानंद म्हांबरे, वक्ते डॉ. दत्तेश परुळेकर व गिरिराज पै वेर्णेकर उपस्थित होते. कार्यक्रमाला अनेक उद्योजक, व्यावसायिक व भाजपाचे मंत्री, आमदार, अपक्ष आमदार, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहे. या काळात जी सरकारे आली आणि त्यांचे काम व पंतप्रधान मोदी यांचे काम यात तुलना होणारच व ती व्हायलाही हवी. मोदी यांचे राजकीय कार्य समाजसेवेचे आहे. योगाला आंतरराष्ट्रीय महत्त्व देऊन भारताला विश्‍वगुरु करण्याचे त्यांचे कार्य व त्यांच्या धोरणामुळे देश बदलत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, की जनधन योजनेमुळे महिलांना बँकात खाती उघडता आली. योजनांचे सर्व पैसे थेट त्यांच्या खात्यात गेले. महिलांसाठी आवश्यक असणारी शौचालये उभी राहिली. मोदी यांचे कार्य सदर पुस्तकातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. भाजपाशी संबंधित नसलेल्या व्यक्तींनी हे पुस्तक लिहिलेले असल्याने त्याला महत्त्व असल्याचे वाघ म्हणाल्या.

तानावडे म्हणाले, नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री बनून विधानसभेत पोचले तसेच लोकसभेतही पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पोचले व पंतप्रधान झाले. त्यांच्या गुजरात व दिल्लीत केलेल्या कामामुळे इतकी लोकप्रियता त्यांना लाभली.
पुस्तकावर गिरिराज पै वेर्णेकर म्हणाले, की मोदी यांनी भाजपला देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचले. त्यांनी सत्ता राबवताना सर्वसामान्यांचा नेहमीच विचार केला. त्यामुळे ते लोकांना मनांमध्ये आहेत. यावेळी डॉ. दत्तेश परुळेकर यांनी सांगितले, की भाजप केंद्रात सत्तेवर येण्यापूर्वी देशात बाँबस्फोट व्हायचे, मात्र 2014 नंतर ते बंद झाले. मजबूत सरकार व त्या सरकारची सुरक्षा ही नीती आहे.

गावातील माती संसद भवनासाठी
नवीन संसद भवनाची पायाभरणी झाली आहे. ते बांधताना प्रत्येक गावातील माती तेथे पोचावी यासाठी भाजपने उपक्रम राबवला आहे. प्रत्येक पंचायती क्षेत्रातील एका व्यक्तीने थोडीशी माती पणजीत आणून द्यावी. हा कार्यक्रम दि.29 रोजी पणजी येथील इस्टिट्यूट मिनेझीस ब्रागांझा सभागृहात संध्याकाळी 4 वाजता होणार आहे. तेथे गोव्याच्या मातीचे पूजन होऊन ती दिल्लीला पाठवली जाणार आहे. सदर माती मंदिर, चर्च व मशीद परिसरातील असावी, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

स्वयंपूर्ण गोवा देशभर
आपण राबवलेले स्वयंपूर्ण गोवा अभियांन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावले. त्यामुळे त्यांनी आपणाकडून सदर अभियानाची सविस्तर माहिती घेऊन भाजपशासीत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी स्वयंपूर्ण गोवासारखे अभियान राबवण्याची सूचना केली, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी दिली.

Back to top button