गोवा : टॅक्सी व्यावसायिकांनी ‘अ‍ॅप’ सेवा सुरू करावी | पुढारी

गोवा : टॅक्सी व्यावसायिकांनी ‘अ‍ॅप’ सेवा सुरू करावी

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  गोवा माईल्स ही टॅक्सीसेवा प्रवाशांना फायदेशीर आहेच, उलट कमाईतील पाच टक्के रक्कम सरकारला मिळत असल्याने ती सरकारसाठीही फायद्याची आहे. गोव्यातील टॅक्सीमालकांनी स्वत:चे अ‍ॅप सुरू करून गोवा माईल्सप्रमाणे चांगली सेवा प्रवाशांना तथा पर्यटकांना द्यावी. सरकार त्यांना अ‍ॅप सुरू करण्यास हवी ती मदत करण्यास तयार आहे, असे प्रतिपादन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी गुरुवारी विधानसभेत केले.

आमदार युरी आलेमाव यांनी गोवा माईल्सचा सरकारला काय फायदा होतो? कोरोना काळात त्यांना सूट का दिली? गोव्यातील सर्व टॅक्सीचालक गोवा माईल्समध्ये का सहभागी होत नाहीत? पर्यटनमंत्री त्यांच्याशी चर्चा करणार आहे का? असे प्रश्न विचारले होते. टॅक्सी व्यवसायाशी सरकार, प्रवासी, पर्टन खाते व टॅक्सीमालक यांचा संबंध येतो. त्यांच्यात ताळमेळ हवा. मात्र, सरकार गोवा माईल्सचे लाड पुरवत आहे. गोवा माईल्समध्ये गोवेकर चालक आहेत का, असा प्रश्न विजय सरदेसाई यांनी विचारला होता. आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी तर गोवा माईल्स  कमी पैसे घेऊन भाडी मारते, त्यामुळे इतर टॅक्सीचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा दावा केला.
या सर्व प्रश्नांना पर्यटन मंत्री खंवटे यांनी उत्तरे दिली.

ते म्हणाले, गोवा पर्यटन राज्य असल्याने पर्यटकांचे हित जपणे, त्यांना चांगल्या सुविधा देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. गोव्यातील टॅक्सीचालक अव्वाच्या सव्वा दर आकारण्याच्या तक्रारी आल्यानंतरच गोवा माईल्स सुरू केली गेली. त्याचा संचालक गोवेकर असून टॅक्सी गोव्यातील आहेत व चालकही गोव्यातील आहेत. गोवा माईल्सला अ‍ॅप सुरू करण्यास सरकारने मदत केलेली नाही, उलट कमाईतील पाच टक्के रक्कम सरकारला महसूल रूपात मिळते. कोरोना काळात वाहतूक बंद होती म्हणून काही दिवस त्यांना महसूल सूट दिली. गोवा माईल्स बाबत पर्यटक खूश आहेत, कारण गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांचे भाडे गोवा माईल्सच्या भाड्यापेक्षा तिप्पट आहे.

गोव्यातील टॅक्सीचालकांनी नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा. स्वत:चा अ‍ॅप सुरू केला तर सरकार त्यांच्याकडून पाच टक्केरक्कम घेणार नाही.
-रोहन खंवटे,
पर्यटन मंत्री

Back to top button