गोवा : श्वानपथकाने केले 243 प्रकरणांत साहाय्य | पुढारी

गोवा : श्वानपथकाने केले 243 प्रकरणांत साहाय्य

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  श्वानाला माणसाचा चांगला मित्र असे समजले जाते. प्रामाणिकपणे काम करणार्‍या श्वानांची घ्राणेंद्रिय क्षमताही चांगली असते. यामुळेच बहुतेक सुरक्षा विभागात स्वतंत्र श्वानपथके असतात. गोवा पोलिसांच्या श्वानपथकात एकूण 12 श्वान काम करत आहेत. त्यांनी गेल्या साडेतीन वर्षात 243 प्रकरणात साहाय्य केले आहे. मंगळवारी आलेक्स रेजिनाल्ड यांनी विचारलेल्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यानी दिलेल्या लेखी उत्तरातून ही माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की , श्वानपथक हाताळण्यासाठी एकूण 34 पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील 2 पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक दर्जाचे आहेत. 12 पैकी 5 श्वान स्फोटके शोधण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आली आहेत. 4 श्वानांना गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी तर 3 श्वान अमली पदार्थाचा माग काढण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आले आहे.

सहा नर, सहा माद्यांचा समावेश
12 पैकी सहा नर तर सहा मादी श्वान आहेत. यामध्ये 7 लॅब्रेडोर, 4 डॉबरमॅन तर एक बॉक्सर जातीचा आहे. सर्वांत तरुण श्वानांमध्ये 1.2 वर्षांचा जय आणि 1.4 वर्षांची कायरा आहे. तर सर्वांत वयोवृद्ध श्वान लॅब्रेडोर जातीची 10 वर्षीय ‘ब्लॅकी’ असून वय झाल्यामुळे तिला कामासाठी वापरण्यात येत नाही. 2019 आणि 2020 मध्ये सर्वाधिक 74 प्रकरणात श्वान पथकांची मदत घेण्यात आली होती.

Back to top button