गोवा : उत्पादन शुल्कचे पथक कागदोपत्रीच ड्युटीवर; गोव्यातून दारु तस्करी सुरुच | पुढारी

गोवा : उत्पादन शुल्कचे पथक कागदोपत्रीच ड्युटीवर; गोव्यातून दारु तस्करी सुरुच

ओटवणे; स्वप्निल उपरकर : जिल्ह्यात गोवा राज्यातील अवैध दारू येण्यापासून रोखण्यासाठी तसेच अवैध वाहतूक थांबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क वेगवेगळी शक्‍कल लढवित आहे. मात्र, या विभागाचे शिलेदार कामावर हजर न राहताच फक्‍त कागदावर ड्युटी दाखवून रखवाली करत असतील तर दारूची तस्करी रोखणे अशक्य आहे. आरोंदा किरणपाणी चेकपोस्ट, बांदा-दाणोली रस्त्यावरील ओटवणे फाटा येथे परजिल्ह्यातील पथके क्‍वचितच पहावयास मिळतात. त्यामुळे या मार्गांवरून मोठ्या प्रमाणावर दारू माफिया बिनदिक्‍कतपणे अवैध दारू वाहतूक करीत आहेत.

आरोंदा- किरणपाणी चेकपोस्ट येथे परजिल्ह्यातील पथकांची अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी नेमणूक केली जाते. मात्र या कार्यक्षेत्रात कार्यरत पथक ड्युटीवरच नसल्याचा फायदा घेत दारूची राजरोस वाहतूक केली जाते. ओटवणे फाट्यावर कार्यरत पथके एका अलिशान हॉटेलमध्ये स्थिरावलेली असतात. प्रत्यक्ष कार्यक्षेत्राच्या ठिकाणी अधिकारी नसल्यामुळे दारू व्यावसायिक बिनदिक्‍कत दारूची वाहतूक करीत असतात, असे स्थानिकांचे म्हणणे असून, याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे. राज्य उत्पादन विभागाच्या अधिकार्‍यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

गोव्यातून दारू वाहतुकीसाठी स्थानिकांचा वापर

अवैध दारू वाहतूक थांबवण्याकरिता गृह विभाग शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. परंतु चेकपोस्टवरून दारू महाराष्ट्रात आणण्याकरिता परजिल्ह्यातील दारू तस्कर आपल्या वाहनातून दारू न आणता स्थानिकांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्या वाहनातून अवैध दारू चेकपोस्ट ओलांडून आणत आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारीच हजर नसल्यामुळे हे सहजरित्या करणे शक्य होत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदा दारू वाहतुकीला ऊत आला आहे.

Back to top button