गोवा : फोंड्यातील वाहतूक कोंडी सोडविणार | पुढारी

गोवा : फोंड्यातील वाहतूक कोंडी सोडविणार

फोंडा,  पुढारी वृत्तसेवा : फोंडा शहरातील गैरसोयी तसेच नागरिकांना सतावणार्‍या समस्या दूर करण्यासाठी कृषिमंत्री रवी नाईक यांनी मंगळवारी अधिकार्‍यांची बैठक घेतली. राजीव गांधी कलामंदिरात झालेल्या बैठकीत सरकारी अधिकारी तसेच पोलिस अधिकारी, नगराध्यक्ष रितेश नाईक, इतर नगरसेवक उपस्थित होते.

फोंडा शहरात पार्किंगची समस्या तसेच शाळा, विद्यालये सुरू झाल्याने सकाळी तसेच दुपारी शाळा सुटण्याच्या वेळेला वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आवश्यक कृती योजना करण्याची सूचना नाईक यांनी वाहतूक पोलिसांना केली. विशेषतः फोंड्यातील आल्मेदा हायस्कूल हे मध्यवर्ती शहर भागात असल्याने येथील विद्यार्थ्यांना रस्ता पार करणे अडचणीचे ठरते. त्यामुळे विद्यालय व्यवस्थापनाकडे आवश्यक चर्चा करून पोलिसांच्या सहकार्याने ही समस्या दूर करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत फोंडा शहराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे केंद्राकडून फोंडा शहराच्या विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. फोंड्यातील मास्टरप्लॅन तयार करताना सर्वांना विश्‍वासात घेऊन प्रतिक्रिया घेण्यात येतील. फोंडा मासळी मार्केट प्रकल्प उभारण्यासोबतच शास्त्री मॉल तसेच गोल्डन ज्युबिली प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष नाईक यांनी सांगितले.
फोंड्यातील शास्त्री सभागृहाची इमारत पाडून त्याजागी भव्य शास्त्री मॉल उभारण्यात येणार आहे. याशिवाय फोंड्यातील भूमिगत वीजवाहिन्या व इतर विजेची कामे करण्यासाठी केंद्राकडून दीडशे कोटी रुपये मिळणार असल्याचे ते म्हणाले.

वाहन चालकांना लावणार शिस्त
फोंड्यातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सध्या पालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. फोंडा वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने आवश्यक त्या ठिकाणी पार्किंगसाठी पांढरे पट्टे मारण्यात आले असून वाहनचालकांनी शिस्तीत पार्किंग करावे, असे आवाहन करताना वाहतूक पोलिस बेशिस्त पार्किंगवर कारवाई करताना वाहने उचलून नेतील, असे यावेळी सांगण्यात आले.

फोंडा बसस्थानक ते ढवळी बगल मार्ग
फोंडा बसस्थानकाकडून झरेश्‍वर देवालय ते ढवळी बगल रस्त्यापर्यंत नवीन मार्ग उभारण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे फोंड्यातील वाहतूक व्यवस्था सुविहित होण्याबरोबरच वाहतुकीचा ताणही कमी होणार आहे, या कामाला चालना देण्यात येत असल्याचेही कृषीमंत्री रवी नाईक यांनी सांगितले.

Back to top button