पणजी : अंगणवाडी सेविकांचे आता बेमुदत उपोषण | पुढारी

पणजी : अंगणवाडी सेविकांचे आता बेमुदत उपोषण

पणजी : पुढारी वृत्तसेवा ; आपले निलंबन मागे घेऊन आपणाला सेवेत पुन्हा घ्यावे, या मागणीसाठी गेले बावीस दिवस आझाद मैदानावर आंदोलन करणार्‍या सात अंगणवाडी सेविकांनी गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

याबाबत सेविकांच्या प्रमुख देवयानी तामसे यांनी सांगितले की, आमचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी आम्ही सात अंगणवाडीसेविका 26 मे पासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहोत. मात्र, आमची कुणीही दखल घेतली नाही. चार दिवसांपूर्वी राज्याच्या मुख्य सचिवांनी आमची भेट घेतली व आम्हांला भेटण्यास बोलावले. आम्ही त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी आमचे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर सुरू असल्याचा आरोप करत आंदोलन संपवा, न पेक्षा अटक करू, अशी धमकी आम्हांला दिली आहे.

मात्र आम्ही त्या धमकीला न घाबरता आमचे आंदोलन आता उपोषणाच्या माध्यमातून सुरू ठेवणार आहोत. आम्ही काही वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम केलेले असताना मुख्य सचिव आम्हांला सहा महिने तात्पुरते कामावर घेतो आणि आमची वागणूक पाहून त्यानंतर नियमित घेण्याबाबत विचार करतो असे सांगत आहेत. मात्र, आम्हाला या अटी मान्य नाहीत, असे त्या म्हणाल्या. अन्य अंगणवाडी सेविकांनी आम्हाला पाठिंबा देऊ नये यासाठी महिला व बालकल्याण खात्याच्या संचालकांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांना पत्र पाठवले आहे.

आंदोलनाकडे सरकारची पाठ

अंगणवाडी सेविकांच्या सचिव विद्या नाईक म्हणाल्या की, सरकार महिलांच्या विकासाच्या अनेक गोष्टी सांगते. मात्र, आम्ही 22 दिवस उपोषण करत असतानाही सरकार आमची दखल घेत नाही.

Back to top button