पणजी : दोन वर्षांनी गजबजल्या शाळा | पुढारी

पणजी : दोन वर्षांनी गजबजल्या शाळा

पणजी ः पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारी नियंत्रणात आल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी राज्यातील शाळा आज दि. 6 पासून पुन्हा गजबजल्या. पहिले ते बारावी पर्यंतच्या सुमारे 1,700 शाळा व त्यातील सुमारे 2,74,207 विद्यार्थी आज नव्या वर्गात प्रवेश करते झाले. नवे वर्ग काही नवे सवंगडी, नवी वर्ग शिक्षिका आणि अभ्यासही नवा. काही मुलांची शाळा बदलली, काहींचे गणवेश बदलले. अशा या नव्याच्या नवलाईत शाळा परिसरात मुलांचा किलबिलाट आज सुरू झाला. राज्यात कोरोनाची भीती अद्यापही असल्याने व हल्लीच्या काही दिवसांत नव्या कोरोना बाधितांची संख्या वाढू लागल्याने तोंडाला मास्क लावून व सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थी शाळांत दाखल झाले. शाळेचा पहिला दिवस असल्याने वर्ग लवकर सोडण्यात आले.

 मध्यान्न आहार नाही की बालरथ नाही

राज्यातील 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी बालरथाची सोय आहे. तसेच 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मध्यान्न आहार तथा अल्पोपहार शाळेत उपलब्ध असतो. तसेच पुस्तकेही मोफत मिळतात. मात्र 9 वीनंतरच्या विद्यार्थ्यांना या सर्व सवलती नाहीत त्यामुळे 9 वीच्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या खर्चाने शाळेत जावे लागते. तसेच खाऊ चा डबा घेऊन जावे लागते तसेच पुस्तकेही स्वत: खरेदी करावी लागली आहे.

मागील वर्षाचे सरकारी व खाजगी शाळांचे विद्यार्थी

प्राथमिक शाळा – 93,611
पुर्व माध्यमिक -70.770
माध्यमिक – 69,277
उच्य माध्यमिक – 40,549

मुख्यमंत्र्यांनी दिली शाळांना भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज आपल्या मतदारसंघातील भामई उसगाव येथील ताराबाई दळवी तसेच धारबांदोडा तालुक्यातील सरकारी प्राथमिक शाळेला भेट दिली. आज शाळेचा पहिला दिवस होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही भेट दिली व विद्यार्थ्यांचे कौैतुक करीत चांगले शिकण्याची सूचना केली. अनेक विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चाही केली. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आपल्या शाळेत आल्याबद्दल धारबांदोडा येथील सरकारी शाळेेतील लहान लहान मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत छायाचित्रेही घेतली.

गणवेशासाठी धावाधाव काही विद्यार्थी प्राथमिक शाळेतून हायस्कूलमध्ये गेले तसेच काही विद्यार्थ्यांनी शाळा बदलल्या. य सर्वांना गणवेश मिळवण्यासाठी त्यांच्या पालकांना बरीच धावाधाव करावी लागत आहे. काही दुकानदारांनी जवळच्या शाळांचे गणवेश रेडिमेंड उपलब्ध केले असले तरी ते नको, अशी भूमिका घेत मुले टेलरकडूनच शिवून हवे, असा हट्ट धरत असल्याने व काही ठिकाणी गणवेशाचे कापड उपलब्ध नसल्याने पालकांना बराच घाम गाळावा लागत आहे.

Back to top button