एल्विस गोम्स यांच्या काँग्रेस प्रवेशावर युरींचा हल्लाबोल | पुढारी

एल्विस गोम्स यांच्या काँग्रेस प्रवेशावर युरींचा हल्लाबोल

मडगाव ; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांच्या विरोधाला न जुमानता विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काँग्रेस विरोधात काम केलेल्यांना पक्षात प्रवेश देण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे प्रदेश काँग्रेसमध्ये फुटाफुटीचे राजकारण सुरू झाले आहे. ‘आप’चे माजी नेते एल्विस गोम्स यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर त्यांना शुभेच्छा देणार्‍या युरी आलेमाव यांनी तासाभरात पत्रक काढून कुंकळ्ळी पालिकेत एल्विस यांनी काँग्रेसचे पॅनेल पाडण्यासाठी भाजपला सहकार्य केले होते, असा आरोप केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

‘आप’चे माजी निमंत्रक एल्विस गोम्स यांना पक्षात प्रवेश देऊन एक तास उलटण्यापूर्वीच युरी आलेमाव यांनी गोम्स यांच्यावर त्यांनी गेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेसचे पॅनेल पाडण्यासाठी भाजपशी हातमिळवणी केली होती, असा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला प्रत्युत्तर देताना युरी यांनी हा आरोप आपल्या पक्ष प्रवेशावेळी तोंडावर करणे गरजेचे होते.पाठीमागे आरोप करून ते काय साध्य करू इच्छित आहेत, हे आपल्याला माहिती नाही. युरी आलेमाव यांच्या आरोपांची दखल पक्ष घेईल, असे गोम्स यांनी सांगितले आहे.

युरी आलेमाव हे कुंकळ्ळीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहेत. रविवारी पणजीत एल्विस गोम्स यांना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश देण्यात आला. यावेळी युरी आलेमाव हे सुध्दा उपस्थित होते. त्यांनी एल्विस यांना शुभेच्छाही दिल्या.

त्यानंतर त्यांनी पत्रक काढून कुंकळ्ळी पालिका निवडणुकीत एल्विस गोम्स यांनी काँग्रेसचे पॅनेल पाडण्यासाठी भाजपला सहकार्य केले होते, असा आरोप केल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. एल्विस यांनी पॅनेल पडण्यासाठी प्रयत्न केले नसते, तर पालिकेवर आणखी तीन जागा आम्ही जिंकल्या असत्या, असा दावा त्यांनी केला. इतर पक्षाचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांना आपले राजकीय भवितव्य काँग्रेस पक्षात दिसून येत आहे.

कुंकळ्ळीतील काँग्रेसचा उमेदवार कोण असेल हे लोकांनी आधीपासूनच ठरवलेले आहे. एल्विस यांच्या उमेदवारी बद्दल बोलताना प्रत्येक मतदारसंघात दोनपेक्षा जास्त उमेदवार इच्छुक असतात. मात्र, जिंकून येण्याची क्षमता, मतदारसंघात केलेले काम आणि उमेदवाराची विश्वाहर्ता पाहूनच उमेदवारी दिली जाते, असे युरी सांगितले.

यासंदर्भात एल्विस गोम्स यांना विचारले असता, आपल्या पक्ष प्रवेशावेळी युरी उपस्थित होते. आपण भाजपबरोबर हातमिळवणी केली होती, हे त्यांनी तेव्हाच पक्षश्रेष्ठींसमोर बोलणे आवश्यक होते. युरी यांनी आमने-सामने येऊन चर्चा करावी.पाठीमागे बोलू नये, असा इशारा त्यांनी दिला. त्यांच्या आरोपांबद्दल आपण काही बोलणार नाही. मात्र, त्यांच्या कृतीची दखल पक्ष घेईल, असे एल्विस म्हणाले. दहा आमदार पक्ष सोडून गेल्यामुळे लोकांचा पक्षावर विश्वास उडत चाललेला आहे. जनतेचा विश्‍वास आम्हाला परत मिळवायची आहे. मला उमेदवारीबाबत काहीच बोलायचे नाही. मी राज्याच्या हितासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असे ते म्हणाले.

सांगे,कुडतडेेतही फुटाफुटीची नांदी

माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांना पक्षात प्रवेश दिल्याने वेळ्ळीतील कार्यकर्त्यांनी राडा केला होता. त्यानंतर एल्विस गोम्स यांच्या पक्ष प्रवेशानंतर युरी आलेमाव आणि त्यांच्या समर्थकांची अस्वस्थता दिसून आली आहे. सांगेतून अपक्ष आमदार प्रसाद गावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये, काँगे्रसचा एक गट सक्रीय झाला आहे. कुडचडेतही अमित पाटकर आणि नगरसेवक बाळकृष्ण होडरकर यांच्यांत फुटाफुटीचे राजकारण सुरू आहे.

Back to top button