सातारा : बेबलेवाडीत पिसाळलेल्‍या कुत्र्याचा ५ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण | पुढारी

सातारा : बेबलेवाडीत पिसाळलेल्‍या कुत्र्याचा ५ जणांना चावा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा बेबलेवाडी (ता. सातारा) येथे  पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांचा चावा घेतला. यामध्ये दोन वृद्ध दापत्य गंभीर जखमी झाले आहेत. तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहिवाशांमधून केली जात आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आज (शनिवार) पहाटे पिसाळलेल्‍या कुत्र्याने नागरिकांना चावा घेत धुमाकूळ घातला. बेबलेवाडी गावानजीक असलेले रहिवाशी अंकुश श्रावण घाडगे व त्यांची पत्नी जयमाला (वय 68) या दोघांना चावा घेऊन कुत्र्याने गंभीर जखमी केले. ग्रामपंचायत शिपाई रामभाऊ मोरे यांच्यासह अन्य दोन लोकांना चावा घेऊन किरकोळ जखमी केले आहे.

यामुळे गावातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, तेथील लोक चिंतेत आहेत. गंभीर जखमी झालेल्या वृद्ध दाम्पत्याला पहाटे शासकीय रुग्णालयमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी वाइल्ड केअर सेंटरला पाचारण करण्यात आले असून, पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध सुरू आहे. संबंधित विभागाने या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी स्‍थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचलं का?

Back to top button