पणजी : बाबूशची साथ सोडणे टोनीला महागात | पुढारी

पणजी : बाबूशची साथ सोडणे टोनीला महागात

पणजी : पुढारी वृत्तसेवा
गतवर्षीच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सांताक्रूझमध्ये टोनी फर्नांडिस यांना साथ दिली होती. त्यामुळे ते आमदार बनले; परंतु 2022 मध्ये त्यांनी बाबूश यांचे न ऐकल्याने त्याचा फटका टोनी यांना चांगलाच बसला. किंबहुना त्यांचे दुसर्‍यांदा आमदार होण्याचे स्वप्नही भंगले.

काँग्रेसच्या उमेदवारीवर 2017 मध्ये टोनी फर्नांडिस आमदार झाले. आमदार बाबूश मोन्सेरात यांचे ते कट्टर समर्थक समजले जात. 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत टोनी यांनी पणजी मतदारसंघात बरीच धावपळ केली होती. त्याशिवाय विधानसभेत जाताना किंवा इतर काही ठिकाणी जातानाही आमदार बाबूश टोनी यांना घेऊन जात; परंतु आता टोनी हे त्यांच्याबरोबर दिसत नसल्याचे चित्र चर्चेचा विषय ठरला आहे. बाबूश यांनी सांताक्रूझमध्ये आपले समर्थक तथा ताळगावचे माजी सरपंच आग्नेल डिकुन्हा यांना भाजपची उमदेवारी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला होता; परंतु दुसरीकडे टोनी यांनी मुख्यमंत्र्यांशी अधिक जवळीक साधत मतदारसंघातील विविध विकामकामे पूर्ण करून घेतली. पर्यायी मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमांना बोलावत बाबूश यांची नाराजी ओढावून घेतली. या नाराजीमुळे बाबूश यांनीही टोनी यांच्याशी पूर्वीसारखे संबंध ठेवले नाहीत. बाबूश यांना सांताक्रूझमधून आग्नेल यांना निवडून आणायचे होते, त्यादृष्टीने त्यांना कामालाही लावले होते. एवढेच नाहीतर त्यांना सरपंचपदाचा राजीनामा देऊन प्रचारात लक्ष घालण्यास सांगितले होते. आमदार टोनी यांची मुख्यमंत्र्यांशी असलेली जवळीक पाहता उमेदवारी आपणासच मिळणार हे त्यांना माहीत होते.

भाजपची उमेदवारी टोनी यांना जाहीर झाल्यानंतर बाबूश यांनीही त्या मतदारसंघातील लक्ष काढून टाकले. बाबूश यांनी टोनी यांच्या खांद्यावरील हात काढल्याने टोनी यांना एकाकी प्रचार करावा लागला होता. महत्त्वाची बाब म्हणजे बाबूश यांचे सांताक्रूझमध्ये अनेक परिचित आहेत, 2012 मध्ये ते या परिचित लोकांच्या पाठिंब्यामुळेच सांताक्रूझमधून निवडून येण्याची किमया साधली होती. त्यामुळे तेथील अनेकांचा त्यांच्याशी असलेला संबंध पाहता ही मंडळी बाबूश यांच्या शब्दाला किंमत देणारी असल्याने त्यांनी टोनी यांच्याविषयी फारशी आत्मियता दाखविली नसल्याची चर्चा सांताक्रूझ परिसरात आहे. टोनी यांना पराभवामागे जरी चिंबल आणि इंदिरानगर परिसराने साथ न केल्याचे दिसत असले तरी त्यात बाबूश यांच्या समर्थकांचे डावपेच आहेत हे स्पष्ट आहे.

पंचायतीला तरी सूर जुळणार का?

आगामी ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सांताक्रूझ मतदारसंघातील पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकांत भाजपला सत्ता आणायची झाल्यास टोनी फर्नांडिस यांच्यावर पूर्ण जबाबदारी असेल, असे दिसते; परंतु त्यासाठी टोनी यांना मोन्सेरात यांची साथ घ्यावी लागले, असे काही मेरशी व चिंबलमधील पंचांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथे तरी दोघांचे सूर जुळणार का? असा प्रश्‍न मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.

 

Back to top button