Dhoni in FIFA WC : ब्राझीलच्या सामन्यावेळी धोनीच्या नावाचा जयघोष! | पुढारी

Dhoni in FIFA WC : ब्राझीलच्या सामन्यावेळी धोनीच्या नावाचा जयघोष!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Dhoni in FIFA WC : फिफा विश्वचषकाचा ज्वर संपूर्ण जगाच्या डोक्यावर आहे. लिओनेल मेस्सी, क्रिस्टियानो रोनाल्डो, नेमार, काइलीन एमबाप्पे, हॅरी केन यांच्या खेळाकडे अवघ्या जगाच्या नजरा खिळल्या आहेत. या खेळाडूंनी स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच त्यांच्या नावाचा जयघोष सुरू होतो. मात्र, गुरुवारी रात्री उशीरा झालेल्या ब्राझील विरुद्ध सर्बिया सामन्यात कतारमधील स्टेडियममध्ये एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले. भारतीय क्रिकेट चाहत्याने चक्क ब्राझीलच्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा माजी तर आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीची सात क्रमांकाची जर्सी झळकावून त्याच्या नावाचा जयघोष केला. सीएसकेने त्या चाहत्याचे स्टेडियममधील फोटो रिट्विट केले आहेत. भारतातून अनेक लोक फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पाहण्यासाठी कतारला गेले आहेत.

महेंद्रसिंग धोनीची एक वेगळी फॅन फॉलोइंग आहे. तो मैदानावर खेळत असो की नसो त्याचा चाहत्यांना काही फरक पडत नाही. चाहते धोनीला नेहमी एका वेगळ्या अंदाज, शैलीत सपोर्ट करताना पहायाला मिळतात. असेच दृश्य कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाच्या एका सामन्यात पाहायला मिळाले. ब्राझील आणि सर्बिया यांच्यातील सामन्यादरम्यान एका चाहत्याने चेन्नई सुपर किंग्जची जर्सी परिधान केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे या चाहत्याने महेंद्रसिंग धोनीची 7 नंबरची जर्सी घातली होती. (Dhoni in FIFA WC)

चेन्नई सुपरकिंग्सने चाहत्याचा धोनीच्या जर्सीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. व्हिसलपोडूच्या ट्विटचा हवाला देत चेन्नई सुपर किंग्सने म्हटलंय की, आम्ही जिथे जातो तिथे सर्व काही पिवळे असते. चेन्नई सुपर किंग्जचा चाहता ब्राझीलला पाठिंबा देण्यासाठी चेन्नईची जर्सी परिधान करतो. यावरून सीएसकेचे समर्थक कुठेही आढळून येतात. हे चाहते धोनीला पाठिंबा देण्याची एकही संधी सोडत नाहीत. (Dhoni in FIFA WC)

असे मानले जात आहे की पुढील वर्षी होणारी आयपीएल स्पर्धा ही धोनी शेवटची स्पर्धा असेल. चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर माही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील शेवटचा आयपीएल सामना खेळणार असल्याचा अनेकांनी अंदाज वर्तवला आहे. (Dhoni in FIFA WC)

ब्राझीलचा शानदार विजय

ब्राझील हा ग्रुप जी मधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. त्यांनी आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. ब्राझील संघाकडून अशाच कामगिरीची सर्वांनाच अपेक्षा होती आणि त्यांनी सर्बियाचा 2-0 अशा गोल फरकाने सहज पराभव केला. ब्राझीलचा संघ आता त्यांच्या पुढील सामन्यात स्वित्झर्लंडविरुद्ध खेळणार आहे. स्विस संघानेही एक सामना जिंकला आहे. स्वित्झर्लंडने कॅमेरूनचा 1-0 असा पराभव केला.

नेमारला दुखापत

या सामन्यादरम्यान ब्राझीलचा कर्णधार नेमारला दुखापत झाली. घोट्याला दुखापत झाल्याने तो मैदानाबाहेर होता. जरी त्याची दुखापत गंभीर मानली जात नसली तरी टूर्नामेंटच्या आगामी सामन्यांमध्ये तो खेळताना दिसेल की नाही याची चिंता चाहत्यांना लागून राहिली आहे.

Back to top button